गोंदिया, दि.21 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली दि.19 मे 2026 रोजी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम SIR (Special Intensive Revision) संदर्भात जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनीधी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मतदार याद्यांचे पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम : विशेष सखोल पुनरिक्षणासाठी अर्हता दिनांक- 1 ऑक्टोबर 2026. तयारी, प्रशिक्षण व छपाई- दि.20 ते 29 जून 2026, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी- 30 जून ते 29 जुलै 2026, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण- दि.29 जुलै 2026 पर्यंत. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी- दि.5 ऑगस्ट 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी- दि.5 ऑगस्ट ते 4 सप्टेबर 2026, नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे- दि.5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026, अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी- दि.7 ऑक्टोबर 2026.
भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा 1950-51 मध्ये विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात आले. त्यानंतर 9 वेळा विशेष सखोल पुनरीक्षण झालेले आहे. शेवटचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हे सन 2002-2004 मध्ये करण्यात आलेले आहे.
लोकप्रतिनीधीत्व अधिनियम 950 च्या कलम 21 नुसार नियमीतपणे विशेष सखोल पुनरीक्षण करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणातील शहरीकरण स्थानांतरण मयत तसेच दुबार मतदारांमुळे विशेष सखोल पुनरीक्षण करण्याची गरज भासते.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये सन 2002 च्या मतदार यादीत नाव असलेले मतदार हे पात्र असतील अशा मतदारांचे मॅपींग BLO मार्फत करण्यात येत आहे. आज रोजी गोंदिया जिल्ह्यातील मॅपींग 87 % पर्यंत करण्यात आलेली आहे. मॅपींग करण्यात आलेल्या मतदारांना मॅपींग तपशीलासह Enumeration Forms दिला जाणार आहे व हा Enumeration Form त्या घरातील वयस्क व्यक्तीच्या स्वाक्षरीने परत प्राप्त करुन घेऊन त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. ज्यांचे नावाचे मॅपींग झालेली नाही अशा मतदारांना वेगळा अर्ज करावा लागणार असुन अर्जासोबत खालीलपैकी पुरावा जोडावा लागणार आहे.
सुचक कागदपत्रांची यादी : कोणत्याही केंद्र सरकार/राज्य सरकार/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या (PSU) निर्यामत कर्मचारी निवृत्तीवेतनधारकाला जारी केलेले कोणतेही ओळखपत्र/निवृत्तीवेतन देयक आदेश. दिनांक 1 जुलै 1987 पूर्वी भारतात सरकार/स्थानिक प्राधिकरणे/बँका/पोस्ट ऑफिस/एलआयसी/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे (PSUs) जारी केलेले कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र/दस्तऐवज. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला जन्म दाखला. पारपत्र (पासपोर्ट). मान्यताप्राप्त मंडळे/विद्यापीठांनी जारी केलेले मॅट्रिक्युलेशन/शैक्षणिक प्रमाणपत्र. सक्षम राज्य प्राधिकरणाने जारी केलेले कायम रहिवासी प्रमाणपत्र. वन हक्क प्रमाणपत्र. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले ओबीसी/एससी/एसटी किंवा कोणत्याही जातीचे प्रमाणपत्र. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (जिथे उपलब्ध असेल तिथे). शासनाद्वारे सांभाळली जाणारी कुटुंब नोंदणी. कोणत्याही वैधानिक/प्रशासकीय नियमांनुसार अधिकारी. शासनाकडून दिलेले कोणतेही जमीन घर वाटप प्रमाणपत्र. आधारसाठी आयोगाचे दि.9 सप्टेबर 2025 (परिशिष्ट-2) अन्वये जारी केलेले निर्देश लागू होतील.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत BLO हे मतदारांच्या घरी जाऊन भेटी देणार आहेत. राजकीय पक्षांनी सुध्दा त्यांचे प्रतिनीधी BLA नेमावयाचे आहे. मतदारांना ऑनलाईन सुध्दा Enumeration Forms किंवा नवीन नमुना 6 भरता येणार आहे.
गोंदिया जिल्हयात एकुण 1285 मतदान केंद्र आहेत. सर्व मतदान केंद्राकरीता BLO यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सर्व मतदान केंद्राकरीता सर्व राजकीय पक्षांनी BLA यांची नेमणुक करावयाची आहे.
प्रारुप मतदार यादी दि.5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. त्यांनतर दावे व हरकती दि.5 ऑगस्ट ते 4 सप्टेबर 2026 पर्यंत स्विकारण्यात येणार आहे. दावे व हरकती दि.5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत निकाली काढणार आहे. व दि.7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी विजय अवधाने यांनी दिली.





