23.5 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ बालकांवरील हिंसा रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी डॉ.मंगेश...

बालकांवरील हिंसा रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

0
33

*जिल्हाधिकाऱ्यांनी बालकांसंबंधीत कार्यरत यंत्रणांचा घेतला आढावा*

गोंदिया, दि.21 : जिल्ह्यात बालकांवर होणारे लैंगिक अपराध, हिंसा, बालविवाहाचे प्रमाण संपुष्टात आणण्यासाठी बालकांसंबंधीत काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि.15 मे 2026 रोजी जिल्हा बाल संरक्षण समिती, बाल कल्याण समिती आणि चाईल्ड हेल्प लाईन समितीची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास आधिकारी तुषार पौनिकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार, विशेष बाल पोलीस पथक प्रमुख नंदिनी चानपुरकर, मानसोपचार तज्ञ डॉ.स्नेहा शर्मा, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती खोब्रागडे, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह बालगृहाच्या अधिक्षिका मनिषा आंबेडारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

बालकांवर होणारे लैंगिक अपराध, हिंसा रोखण्यासाठी तसेच बालविवाहासारखे अनिष्ट प्रथा, रुढी संपुष्टात आणण्यासाठी ग्राम स्तरावर ग्राम बाल संरक्षण समित्यांचे तसेच शाळा, महाविद्यालय आणि बालक-पालक, शिक्षकांचे प्रशिक्षण घेऊन बालकांसंबधीत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. संबंधित यंत्रणांसोबत समन्वय ठेवण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत बालकांवर झालेल्या अपराधाची नोंद होणे आवश्यक असुन पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन 1098 तसेच बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी सुध्दा कार्यक्षमपणे सतर्कतेने काम करावे. यापुढे बालकांसंबंधीत घडणाऱ्या घटना कमी होणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

बालकांवरील लैंगिक अपराधाचे गुन्हे, अवैद्य दत्तक प्रकरण बालविवाह होत असल्यास त्यावर वेळीच आळा घालण्यासाठी बेकायदेशीर प्रकरण सहकार्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावे. तसेच जवळचे पोलीस स्टेशन, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाईल्ड हेल्प लाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

सदर तिन्ही समितीच्या आढावा बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत महिला व बाल विकास विभागाच्या मिशन वात्सल्य योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असुन काळजी व संरक्षणाच्या बालकांना संस्थेत दाखल करुन संपुर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे तसेच संस्थाबाहय बालकांना योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी प्रास्ताविकेतून सांगितले. तसेच बालविवाह मुक्त भारत, आपल्या संकल्प अभियान या 100 दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्हाभर चित्ररथ फिरवुन जनजागृती करण्यात आली असून आतापर्यत 22,474 लोकांनी बालविवाहाची शपथ घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. ग्रामस्तरावर बालकांसंबधीत कायद्याची ओळख व्हावी म्हणून ग्राम बाल संरक्षण समित्याचे प्रशिक्षण घेण्यात आल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले.

जिल्हा बाल संरक्षण समिती आणि चाईल्ड हेल्प लाईनचा संपुर्ण आढावा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी सादर केला, तर बाल कल्याण समितीचा संपूर्ण आढावा श्रीमती खोब्रागडे यांनी सादर केला.

या त्रैमासिक सभेत एकूण 3 बालविवाह थांबविण्यात आले असुन संपूर्ण वर्षभरात एकुण 14 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. 02 बालकामगार ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बालसंगोपन योजनेअंतर्गत 3,874 बालकांना तर प्रायोजकत्व योजनेअंतर्गत 467 बालकांना लाभ देण्यात आलेला आहे. वर्षभरात 181 बालकांना अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले असुन 15 बालकांना शासकीय नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी टक्के आरक्षणातून लाभ प्राप्त झालेला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत 25 प्रकरणे हाताळलेली असून 19 बालिकांना सपोर्ट पर्सन बाल कल्याण समितीकडून नियुक्त करण्यात आलेले आहे. बाहेर राज्यातील मिळून आलेल्या 9 बालकांना पोलीस स्कॉट मार्फत त्यांच्या स्थानिक राज्यात सुरक्षित स्थानांतर करण्यात आले आहे. विशेष दत्तक संस्थेमध्ये प्रवेशित बालकांपैकी एकूण 3 बालकांना केंद्रीय दत्तक विधान प्रक्रियेव्दारे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन दत्तक देण्यात आलेले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

सभेला विनोदकुमार माने, डॉ.सचिन उईके, आचल फुलेकर, बाल कल्याण समितीच्या सदस्य श्रीमती कापगते, श्रीमती हलमारे, श्रीमती बोकडे, श्री. रहांगडाले, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, अमित बेलेकर, शिक्षण विभागाच्या कुलदिपीका बोरकर, जिल्हा महिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी मुकेश पटले, रविंद्र टेंभुर्णे, समुपदेशक मनिषा माहुले, धर्मेंद्र भेलावे, नरेश लांजेवार, रुपेश चंडूके, पुनेश नाकाडे, भागवत सुर्यवंशी तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी पुजा डोंगरे, मनिषा हटवार, अश्विनी मेश्राम, आरती ठाकरे, आनंद रामटेके उपस्थित होते.

blank