25.3 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ मानधनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

मानधनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

0
109

गोंदियाः पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन अदा करण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून, थकीत मानधन तत्काळ अदा करावे, या मागणीसाठी आज १ जूनपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलना सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले असून यापूर्वी तसे निवेदन जिल्हा परिषद गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांना देण्यात आले आहे.आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १ जून ते ५ जून दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ८ तारखेला मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्यात मागण्या मान्य होईपर्यंत राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे पाणी व स्वच्छता विभागाचे विविध काम ठप्प होण्याची शक्यता असून, त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस शासन आणि प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गांधी पटले, सचिव कैलाश कोरे, सुभाष बोहरे, छाया बोरकर, तृप्ती साकुरे, शोभा फटींग यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट व समुह समन्वयक, जिल्हा कक्षातील सर्व? कर्मचारी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, अभियान संचालक यांना सुध्दा निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान त्याची दखल घेण्यात आली नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.

blank