37.7 C
Gondiā
Saturday, June 27, 2026
Home विदर्भ 28 जून रोजी प्रत्येक बालकाला पोलिओचे ‘दोन थेंब’ पाजून पोलिओमुक्त गोंदियाच्या संकल्पाला...

28 जून रोजी प्रत्येक बालकाला पोलिओचे ‘दोन थेंब’ पाजून पोलिओमुक्त गोंदियाच्या संकल्पाला बळ द्या!

0
23

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर व उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे यांचे पालकांना आवाहन

गोंदिया, दि. 27 जून  : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २५ जून रोजी जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. लायकरामजी भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २८ जून रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मा. श्री. सुरेशजी हर्षे यांनीही मोहिमेच्या प्रभावी नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

बैठकीत मार्गदर्शन करताना अध्यक्ष श्री. लायकरामजी भेंडारकर म्हणाले की, भारताने पोलिओमुक्त देशाचा मान मिळवला असला तरी जगातील काही देशांमध्ये अद्याप पोलिओचा धोका कायम आहे. त्यामुळे हा धोका पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला २८ जून रोजी पोलिओचे ‘दोन थेंब’ अवश्य पाजावेत. पोलिओमुक्त भारत कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ही राष्ट्रीय जबाबदारी समजून सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती श्री. सुरेशजी हर्षे यांनी आरोग्य विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत सांगितले की, जिल्ह्यातील प्रत्येक गाव, पाडा तसेच दुर्गम व अतिदुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पोलिओ बूथ, मोबाईल पथके आणि ट्रान्झिट पथकांची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, तसेच लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, “२८ जून रोजी आपल्या घरातीलच नव्हे तर शेजारील आणि नातेवाईकांच्या ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओचे ‘दोन थेंब’ अवश्य पाजावेत. आपल्या मुलांचे निरोगी भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही अत्यंत आवश्यक आणि जबाबदारीची बाब आहे.”

बैठकीस जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये श्रीमती रचनाताई गहाणे, श्रीमती छायाताई नागपुरे, श्रीमती गीताताई लिल्हारे, श्रीमती वैशालीताई पंधरे, श्रीमती सुधाताई रहांगडाले, श्री. प्रवीणजी पटले, डॉ. भूमेश्वर पटले आणि श्री. रूपेशजी कुथे उपस्थित होते.

तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. विजय आखाडे, साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, श्री. मिलिंद नंदागवळी, श्री. प्रशांत खरात तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी (THO) उपस्थित होते.

बैठकीत मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन, बूथ व्यवस्था, मोबाईल पथके, जनजागृती उपक्रम तसेच दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.