25.2 C
Gondiā
Sunday, July 5, 2026
Home विदर्भ १६ गावांची पाणीटंचाई दूर;जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी यांचा पुढाकार

१६ गावांची पाणीटंचाई दूर;जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी यांचा पुढाकार

0
8

चित्रा कापसे/तिरोडा- तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागामार्फत विविध गावांमध्ये विंधन विहिरी (बोअरवेल) मंजूर करून त्यांची उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे हजारो नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध झाले असून अनेक गावांतील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत झाली आहे.
जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी यांच्या पाठपुराव्यामुळे मागील चार वर्षांत कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील सुमारे १६ गावांमध्ये विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अनेक गावांमध्ये गरजेनुसार दोन ते पाच विंधन विहिरी उभारण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पिण्याच्या पाण्यासह रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या विविध कामांवरही सातत्याने भर देण्यात येत असून, प्रत्येक गावापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे किरणकुमार पारधी यांनी सांगितले.
“विकास हा केवळ आश्वासनांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे,” अशी भूमिका व्यक्त करत त्यांनी जनतेचा विश्वास, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि नागरिकांचे सहकार्य हीच आपल्या कार्याची खरी ताकद असल्याचे नमूद केले. भविष्यातही “प्रत्येक गावाचा विकास – प्रत्येक कुटुंबाचा विश्वास” हे ध्येय समोर ठेवून अधिक जोमाने जनसेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.या विकासकामांमुळे कवलेवाडा क्षेत्रातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.