28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ ताडगावच्या ग्रामस्थांची २० वर्षांची प्रतीक्षा संपली; विकासकामांना प्राधान्य– पौर्णिमाताई ढेंगे

ताडगावच्या ग्रामस्थांची २० वर्षांची प्रतीक्षा संपली; विकासकामांना प्राधान्य– पौर्णिमाताई ढेंगे

0
8

अर्जुनी-मोर.-तालुक्यातील ताडगाव येथे ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांच्या दळणवळणाची अनेक वर्षांची अडचण दूर करणाऱ्या पायदळ पुलिया बांधकामाचे भूमिपूजन मंगळवार, २८ जुलै रोजी या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना पौर्णिमाताई ढेंगे म्हणाल्या की, “ताडगावातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून तलावाचे पाणी ओलांडून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून विशेष प्रयत्न केले. जिल्हा विकास निधीतून लघु पाटबंधारे विभागामार्फत १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून हे काम मार्गी लावण्यात आले आहे. भविष्यातही प्रत्येक गावातील मूलभूत सुविधा, सुरक्षित दळणवळण आणि विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.”
ताडगाव येथे गेल्या वीस वर्षांपासून पायदळ पुलाची मागणी प्रलंबित होती. ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांना तलावाचे पाणी ओलांडून प्रवास करावा लागत असल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगे यांनी विशेष पाठपुरावा करून लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जिल्हा विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी पौर्णिमाताई ढेंगे यांचे आभार व्यक्त केले.
भूमिपूजन कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य नूतनलाल सोनवाणे, सरपंच गणिताताई नाकाडे, उपसरपंच दशरथ शहारे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कैलास कापगते, माजी सरपंच अमृत नाकाडे, माजी उपसरपंच दामू शहारे, माजी जिल्हा परिषद सभापती उमाकांत ढेंगे, शाखा अभियंता पिंपळे, शाखा अभियंता सौ. भाजीपाले, ग्रामपंचायत अधिकारी मडावी, पोलीस पाटील अभिजीत नाकाडे, दिलीप नाकाडे, नितीन नाकाडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.