25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ बँकींग कायद्यात वेळेनुसार बदल करणे तेवढेच गरजेचे-राजेंद्र जैन

बँकींग कायद्यात वेळेनुसार बदल करणे तेवढेच गरजेचे-राजेंद्र जैन

0
9

: बँकर विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा
गोंदिया : राज्यसभेत ‘बैंकर वही साक्ष विधेयक २०२६’ वर झालेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खा. राजेंद्र जैन यांनी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. कायद्यात वेळेनुसार बदल करणे गरजेचे असून १८८१ चा जुना कायदा आजच्या डिजिटल भारताच्या आणि आधुनिक बैंकिंग व्यवस्थेच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, असे मत सोमवारी (दि. १०) सभागृहात या विधेयकावर बोलताना व्यक्त केले. खा. राजेंद्र जैन यांनी सांगितले की १८८१ मध्ये जेव्हा मूळ कायदा बनवला गेला होता, तेव्हा संगणक, इंटरनेट, मोबाइल बैंकिंग किंवा डिजिटल स्वाक्षरी यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. परंतु आज भारत जगात यूपीआयद्वारे होणाऱ्या रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये आघाडीवर आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात २२१.६७ अब्जाहून अधिक किरकोळ डिजिटल व्यवहारांमध्ये यूपीआयचा वाटा ८१ टक्के राहिला आहे.
ही देशासाठी अत्यंत भूषणावह बाब आहे. या नव्या विधेयकामुळे न्यायालयीन प्रक्रियेत सुलभता येईल आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार न्यायालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यामुळे बँक कर्मचारी आणि ग्राहक दोघांचाही महत्त्वाचा वेळ वाचेल. वाचलेल्या वेळेचा उपयोग मुद्रा लोन, पीएम एम्प्लॉयमेंट गॅरंटी आणि कृषी पायाभूत सुविधा यांसारख्या शासकीय योजना अधिक गतीने राबवण्यासाठी होईल. ग्रामीण भागातील सहकारी बँकांच्या आधुनिकीकरणावर बळकटीकरणावर त्यांनी भर दिला. हे विधेयक केवळ बँक नोंदींपुरते मर्यादित नसून डिजिटल भारत, पारदर्शक न्यायव्यवस्था व आधुनिक आर्थिक यंत्रणेला बळ देणारे पाऊल असल्याचे सांगत त्यांनी हे विधेयक सभागृहाने एकमुखाने मंजूर करावे असे मत व्यक्त केले.

blank