शेतकऱ्यांची गैरसोय टाळणार ऑनलाईन सात-बारा स्विकारणार- अभिमन्यू काळे

0
8

गोंदिया,दि.२३ : जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम सन २०१६-१७ करीता धानाची खरेदी जिल्हा मार्केटींग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. मागील काही दिवसापासून तलाठ्यांचा संप सुरु असल्याने शेतकरी सन २०१५-१६ चा सात-बारा केंद्रावर घेवून येत आहे. शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन सात-बारा स्विकारणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली.
२२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवाई, जिल्हा मार्केटींग अधिकारी श्री.खर्चे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, जिल्ह्यात १ लाख ९१ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. यापैकी १ लाख ८७ हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात येते. यावर्षी धानाचे पीक उत्तम असून गैर आदिवासी क्षेत्रात जिल्हा मार्केटींग अधिकारी यांचेमार्फत जिल्ह्यातील ५७ धान खरेदी केंद्रावर १ लाख ७० हजार ६०० क्विंटल व आदिवासी क्षेत्रात ३८ धान खरेदी केंद्रावर ४७ हजार ९३० धानाची खरेदी करण्यात आली आहे.
धान खरेदीकरीता सात-बारा व त्यावरील धानपिकाखालील क्षेत्र यासाठी शेतकऱ्यांना तलाठी हा सात-बारा देतो. त्यानुसार धान खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते असे सांगून जिल्हाधिकारी श्री.काळे पुढे म्हणाले, सद्यस्थितीत सात-बाराचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे. जिल्हा मार्केटींग अधिकारी व आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक यांना बोलावून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करुन केवळ शेतकऱ्यांच्या हितास्तव ऑनलाईन सात-बारा स्विकृती प्रदान केल्याचे त्यांनी सांगितले.
तलाठ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू नये व हमी दरापेक्षा कमी दराने धान विक्री करावी लागू नये यासाठी ऑनलाईन सात-बारा स्विकारण्याचा महत्वपूर्ण निर्णय तलाठ्यांचा संप संपेपर्यंत घेण्यात आला आहे. परंतु अशा शेतकऱ्यांनी तलाठ्यांचा संप संपल्यानंतर १५ दिवसाच्या आत तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा मूळ सात-बारा संबंधित केंद्रावर जमा करावा. जे शेतकरी सन २०१५-१६ चा संगणकीकृत सात-बारा सादर करतील त्यांच्याकडून हमीपत्र विहित नमून्यात भरुन घेण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महाभूलेख या संकेतस्थळावरुन ऑनलाईन सात-बारा काढता येईल असे सांगून श्री.काळे पुढे म्हणाले, यासाठी धान खरेदी केंद्रावरील कर्मचारी शेतकऱ्यांना मदत करणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अहवालानूसार यावर्षी धान पिकाचे उत्पादन अधिक असल्याने एकरी १६ क्विंटल धानाची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात येईल. धान खरेदीचे २६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करण्यात आल्याचे सांगून शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावरच धान विक्रीस आणावे असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी यावेळी केले.