मध्यवर्ती बँकेच्या खातेधारकांना मिळणार दिलासा

0
6

गोंदिया,दि.२३ : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार खातेदार आहे. जिल्ह्यातील एकूण खातेदारापैकी हे प्रमाण ३० ते ३५ टक्के इतके आहे. हे सर्व खातेदार शेतकरी असून ग्रामीण भागात राहणारे आहेत. १००० व ५०० रुपये चलन व्यवहारातून बंद केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला चलनाचा पुरवठा अल्प प्रमाणात होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या या खातेदारांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी नुकतीच तातडीची नागपूर येथील रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेतली.या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, जिल्ह्यातील बँकांना चलनाचा पुरवठा हा खातेदारांच्या प्रमाणात करावा. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेस जास्त चलन उपलब्ध होईल. त्यांच्या दैनंदिन गरजा देखील चलन उपलब्धतेमुळे पूर्ण करण्यास मदत होईल. त्यामुळे खातेदार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमधून पैशांचे व्यवहार कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा उपलब्ध होत नाही ही बाब जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी संदिप जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी सांगितले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रतिदिन मागणी ३ कोटी रुपये इतकी आहे. पण दहा दिवसात केवळ ३ कोटी रुपयांचाच पुरवठा करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्याकडून कमी चलन पुरवठा होत आहे. धान खरेदीची हुंडी वटल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. परंतु बँकेत पैसे उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.काळे म्हणाले, समन्यायी पध्दतीने शेतकऱ्यांना पैसे देणार असून आलेल्या चलनपैकी २५ टक्के चलन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्यातील ८८ पैकी ५६ एटीएममध्ये पैसे उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.