नागपूर दि.24 : शुभम महाकाळकर याची हत्येनंतर नागपूरकर सुन्न झाले आहेत. ७२ तास उलटले, तरी मारेकऱ्यांएवढेच जबाबदार असलेले भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांचे पुत्र अभिलाष आणि रोहित यांना पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.
बिलात डिस्काउंट मिळावे, यासाठी बारमध्ये धुडगूस घातल्यानंतर, बारमालकाच्या डोक्यात त्यांनी दारूची बाटलीही फोडली. त्यानंतर, पुन्हा लक्ष्मीभुवन चौकात आमदार पुत्राचे साथीदार आणि बारमालक व त्याचे साथीदार एकमेकांना भिडले. अभिलाष आणि रोहित खोपडे साथीदारांसह पळून गेले. मात्र, खोपडेपुत्रांचा मित्र शुभम महाकाळकर याने जीव गमावला. आमदारपुत्रांच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे शुभमचा नाहक बळी गेल्यामुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
अभिलाष आणि रोहित खोपडे, तसेच त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. यामागे नेमके काय कारण आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांवर राजकीय दडपण नसल्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात. मात्र, दडपण नाही, तर पोलीस आरोपींना अटक का करीत नाही, असा प्रश्न केला असता चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगतात.





