25.8 C
Gondiā
Tuesday, September 1, 2026
Home विदर्भ गावांच्या विकासासोबत शैक्षणिक सुविधांकडेही लक्ष द्या — पोर्णिमाताई ढेंगे

गावांच्या विकासासोबत शैक्षणिक सुविधांकडेही लक्ष द्या — पोर्णिमाताई ढेंगे

0
12

बुधेवाडा, देऊळगाव, बोदरा येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन
अर्जुनी-मोर.-तालुक्यातील ईटखेडा जिल्हा परिषद क्षेत्रातील बुधेवाडा, देऊळगाव व बोदरा येथे विविध विकासकामांना सुरुवात झाली असून, बुधेवाडा येथील आश्रमशाळेच्या पोचमार्गासाठी सिमेंट रस्ता तसेच देऊळगाव व बोदरा येथे सिमेंट नाली बांधकामाचे भूमिपूजन दि. २७ ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमाताई ढेंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोर्णिमाताई ढेंगे म्हणाल्या की, गावांचा सर्वांगीण विकास करताना रस्ते, नाल्या व इतर मूलभूत सुविधांसोबतच शिक्षण आणि बालकल्याणाच्या सुविधांनाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक त्या सुविधांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शाळांकडे जाणारे रस्ते व परिसरातील मूलभूत सुविधा सक्षम असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधेवाडा येथे आश्रमशाळेच्या पोचमार्गासाठी सिमेंट रस्ता, तर देऊळगाव व बोदरा येथे सिमेंट नाली बांधकाम करण्यात येणार आहे. या विकासकामांमुळे विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून, पावसाळ्यातील चिखल व पाण्याचा निचरा होण्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
भूमिपूजनानंतर सभापती पोर्णिमाताई ढेंगे यांनी बुधेवाडा येथील आश्रमशाळेला भेट देऊन तेथील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा, शाळेचा परिसर तसेच आवश्यक बाबींचा त्यांनी आढावा घेतला. तसेच बोदरा व देऊळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनाही भेट देऊन शाळेतील विविध बाबींची माहिती घेतली.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने, भाग्यश्री सयाम, बुधेवाडा सरपंच रोशनी कोराम, उपसरपंच राधेश्याम राऊत, देऊळगाव सरपंच किरण ढवळे, उपसरपंच यमुनाबाई बनकर, बंडुभाऊ सोनवाने, नितीन नाकाडे, ग्रामपंचायत अधिकारी निमजे तसेच बुधेवाडा येथील आश्रमशाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.