गोरेगाव-दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ सहजपणे मिळावा, तसेच दिव्यांग प्रमाणपत्र व UDID (Unique Disability ID) कार्ड मिळविण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी, या उद्देशाने ग्राम पंचायत निंबा व Youth4Jobs Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी ग्राम पंचायत निंबा येथे विशेष दिव्यांग नोंदणी व दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन सरपंच वर्षाताई विजय पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या वेळी प्रमुख्याने उपस्थित पंचायत समिती गोरेगाव येथील विस्तार अधिकारी टी.डी . बिसेन, ग्रामपंचायत अधिकारी ए.सी रहांगडाले, युथ फॉर जॉब फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक रुपेश पेंदाम तसेच दिव्यांग मित्र राजकुमार सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य तथा अंगणवाडी सेविका व लाभार्थी उपस्थित होते.
ग्राम पंचायत निंबा हद्दीतील दिव्यांग नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात UDID कार्ड ,ई-केवायसी ,अद्ययावत करणे, नवीन UDID कार्डासाठी ऑनलाइन नोंदणी करणे, नवीन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे, तसेच रेल्वे सवलत पासासाठी अर्ज व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.
Youth4Jobs Foundation ही संस्था दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविकास व इतर उपलब्ध संधींचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत असून, संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना शासनाच्या योजनांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निंबा परिसरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये लाभार्थ्यांना आधार कार्डसोबत घेऊन येणे, एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणणे तसेच यापूर्वीचे दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास ते सोबत आणणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग नागरिकांना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी सरपंच श्रीमती वर्षाताई विजय पटले यांनी दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी भूमिका व्यक्त केली. दिव्यांग बांधवांना शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
ग्राम पंचायत निंबा, Youth4Jobs Foundation तसेच ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे परिसरातील दिव्यांग नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व नोंदणी प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.





