मोदी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन – देवेंद्र फडणवीस

0
6

नागपूर, दि. 9 – अरबीसमुद्रात बांधण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सर्व आवश्यक परवानग्या देण्यात आल्या असून लवकरच नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मराठा आरक्षणासह, अॅट्रॉसिटी कायदा आणि शेतीच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा मोर्चांनी नवा पायंडा पाडला. मराठा मोर्चे मुक असले तरी त्यांचा आवाज कोट्यावधी मोर्चांपेक्षा मोठा होता. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा समाजातील तरुण-तरुणींचे पैशाअभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी प्रतिपूर्ती योजनेत सामावून घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नोकरीची हमी असलेले कोर्सेस वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. फी द्यायची आहे ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, महाविद्यालये चालवण्यासाठी नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणार नाही पण अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये. कायद्याचा हा गैरवापर टाळण्यासाठी समितीच्या माध्यमातून आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या मोर्चानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून निघणारे अन्य समाजाचे मोर्चे महाराष्ट्रासाठी चांगले नाहीत असे त्यांनी सांगितले. मुस्लिम समाजाचं आरक्षण कुठेही कमी केलेले नाही. उलट शिक्षण योजनेमध्ये मुस्लिम समाजाला 3 लाख जागा उपलब्ध करुन दिल्या असे फडणवीस यांनी सांगितले.