चालकाच्या सतर्कतेने प्रवासी बचावले

0
11

तिरोडा,ता.११: तिरोडा-तुमसर मार्गावरील बिर्सी फाटा शिवारात बस व ट्रॅक्टरच्या धडकेत बस पलटून चार जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ११ च्यासुमारास घडली. चालकांच्या समय सुचकतेने बसमधील इतर प्रवासी बचावले.
तुमसर आगाराची बस क्र. एमएच४0/५१८0 ही तिरोडा येथून तुमसरकडे जात असतांना विरूध्द दिशेने आलेल्या एमएच ३१/सीव्ही ४८५२ क्रमांकाच्या भरधाव ट्रॅक्टरने बसला धडक दिली. यात बस रस्त्याखाली पलटली व बसमधील चालक बिहारीलाल हिरापुरे, वाहक नरेश अतकरी तसेच शबिना युसूफ पठाण (२0, रा. लाखेगाव) व विशाल अरुण कटरे (१४,रा. सरांडी) यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने चालकाने दाखविलेल्या सूचकते बसमधील प्रवाशांना काहीही झाले नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आ. विजय रहांगडाले यांचे स्वीय सहाय्यक विवेक ढोरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमाकांत हारोडे, भाजप शहर अध्यक्ष सलाम शेख, सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहने, संजय खियानी, धीरज बरियेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पोलिस उपनिरीक्षक अनिरुद्ध बचेरे, भाजप कार्यकर्ता निरज सोनवाने यांनीही घटनास्थळी भेट दिली.