कोका अभयारण्य परिसरात वाघाचा धुमाकूळ

0
16

भंडारा ता.११: जंगलव्याप्त कोका अभयारण्य परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यावर उपाययोजना म्हणून वनविभागाने गावाभोवती तारेचे कुंपन करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य उत्तमकुमार कळपाते यांनी केली आहे.

व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव अभयारण्य कोका अंतर्गत येणाऱ्या मांडवी, किटाळी, ढिवरवाडा, सर्पेवाडा, कोका, चंद्रपूर, सालेहेटी, इंजेवाडा, नवेगाव, सितेपार या गावांमध्ये वाघाची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. मागील आठवड्यात ढिवरवाडा येथे एका बालकाचा हकनाक बळी गेला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यासोबतच वन्य जीव प्राण्यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सदर परिसरात मोल मजुरी करून उपजिविका करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. येथील ग्रामस्थांना दैनंदिन कामासाठी भंडारा येथे जावे लागते. मात्र वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांची कामे खोळंबली आहे. वनविभागाने याची दखल घेवून गावाभोवती तारेचे कुंपन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य उत्तमकुमार कळपाते, पंचायत समिती सदस्य नितू सेलोकर, पंचायत समिती सदस्य सुजाता फेंडर, हितेश सेलोकर, रविंद्र रामटेके, राजेंद्र चव्हाण, रामभाऊ ढेंगे, तुकाराम हातझोडे आदींनी केली आहे.