पिपरी घाटावर रेती तस्करांचा दिवसाढवळ्या धुमाकूळ

0
9

सडक अर्जुनी,दि.11- पिपरी ते सौंदडलगत असलेल्या चुलबंद नदी पात्रातील अवैधरित्या गौणखनिज उत्खनन भरदिवसा गुप्त मार्गाने होत आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व रेती माफियांचे लागेबांधे तर नाही, अशी चर्चा जोर धरत आहे.

सौंदड ते पिपरी या मार्गावर दोन्ही गावांना जोडण्याकरीता शासनामार्फत पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या कारणाने पिपरी वाळूघाट, शासनाने ठरावामध्ये घेतले नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे रेती उत्खननाचे ठिकाण पुलापासून १ किमी अंतर इतके असणे बंधनकारक आहे. कारण नदीपात्रातील वाळू उपसा केल्याने खोली वाढेल व नदीपात्राची खोली वाढल्याने पुलाला धोका होण्याची शक्यता आहे. त्या कारणाने हा पिपरी घाट लिलावाकरीता घेण्यात आलेला नाही. पण रेती रात्री, दिवस या घाटावरून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात उत्खनन केली जाते.दररोज जवळपास २० ते ३० ट्रॅक्टर्स रेती या घाटावरून अवैधरित्या लंपास केली जाते.

कुठल्याही प्रकारचा परवाना नसून शासनाला लाखो रुपयांचा महसूल बुडीत जात आहे. उल्लेखनीय असे की, या सर्व प्रकाराला तालुक्यातील मोठ्या अधिकाऱ्यांचे अभय आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यात धाड मारण्यापूर्वी अधिकाऱ्याच्या माध्यमातून रेती तस्करांना कळविले जाते. त्यामुळे थातूरमातूर कारवाई करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकली जाते.मिलीजुली सरकार असा जनतेमध्ये गवगवा चालू आहे. तलाठ्यांच्या समोरून भर रेतीचे ट्रॅक्टर्स जातात पण त्याकडे लक्ष देण्याची वेळ मात्र अधिकाऱ्यांना मिळत नाही.