‘हे राम नथुराम’चा प्रयोग हाणून पाडला

0
4

नागपूर,दि.23-: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर आधारित ‘हे राम नथुराम’ या नाटकामुळे रविवारी रात्री नागपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व संभाजी ब्रिगेडने या नाटकाचा जोरदार विरोध करत डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहासमोर आंदोलन केले. नथुरामचे उदात्तीकरण करून महात्मा गांधी यांचा अपमान करण्याचा हा प्रयत्न असून नाटक बंद करावे, अशी मागणी या पक्षांतर्फे करण्यात आली तर दुसरीकडे शिवसेनेतर्फे नाटकाच्या संरक्षकाची भूमिका घेण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

‘हे राम नथुराम’ या नाटकाला औरंगाबादेत शनिवारी विरोध करण्यात आला होता. रविवारी रात्री ९ वाजता या नाटकाचा प्रयोग देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या नाटकाचा प्रयोग होऊ देणार नाही, अशी भुमिका कॉंग्रेस, राष्ट्रवादीने अगोदरच जाहीर केली होती. त्यामुळे सभागृहाच्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रात्री ८ वाजल्यापासूनच कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते धडकले. त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही वेळातच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेदेखील पोहोचले व त्यांनीदेखील विरोध सुरू केला. सभागृहाच्या दुसऱ्या दारावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष्य सलिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेदेखील पोहोचले. त्यांनी प्रवेशद्वारावर चढून आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरले. सुमारे दीड तास तिन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांसह तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.