जनजागरण मेळाव्यातून प्रशासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न- प्रविण परदेशी

0
14

गोंदिया,दि. २२ : जिल्हयातील दुर्गम, नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातील गुलाबटोला येथे पोलीस विभागाने घेतलेला जनजागरण मेळावा हा कौतुकास्पद कार्यक्रम आहे. या भागातील आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासोबतच त्यांना विकासाच्या प्रक्रीयेत आणण्यासाठी तसेच युवावर्गाला स्वावलंबी करण्यासाठी जनजागरण मेळावे उपयुक्त आहे. जनजागरण मेळाव्यातून प्रशासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांनी केले.सालेकसा तालुक्यातील गुलाबटोला येथे पोलीस विभागाच्या वतीने २१ जानेवारी रोजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून श्री. परदेशी बोलत होते. प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पंचायत समिती सदस्य भरत लिल्हारे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, सुनिल सूर्यवंशी, सरपंच शामलाल लिल्हारे यांची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ हे अध्यक्षस्थानी होते.जिल्हाधिकारी काळे म्हणाले, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील युवकांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचे महत्वाचे कार्य पोलीस विभाग करीत आहे. नक्षलविरोधी अभियानासाठी जिल्हा समितीकडून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. नक्षलग्रस्त भागातील मुलांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी तसेच वाचनीय पुस्तके जास्तीत जास्त उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच त्यांना खेळाचे साहित्यसुध्दा पुरविण्यात येईल. पालकांनी मुलींचे लहान वयात लग्न होणार नाही याची काळजी घ्यावी. दोन मुलात योग्य अंतर ठेवून अपत्य जन्माला यावी. निरोगी मुल जन्माला येण्यासाठी महिलांना चांगला आहार देवून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक डॉ. भूजबळ म्हणाले, या भागातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात येत आहे. पोलीस विभागामार्फत जास्तीत जास्त लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केवळ बंदुकीच्या बळावर संरक्षणापूरतेच मर्यादीत न राहता समाज हिताच्या दृष्टीने देखील पोलीस विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.परदेशी यांच्या हस्ते पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थ्यांना मोफत सायकली व रंनिग सुटचे वाटप करण्यात आले. यावेळी बँक ऑफ इंडियाच्य स्टार स्वंरोजगार संस्थेच्या वतीने आदिवासी उमेदवारासाठी ड्रायव्हींग ट्रेनिंग, आधार कार्ड, नक्षल विरोधी प्रचार-प्रसार, सायबर गुन्हे शाखा व आरोग्य विभाग आदि स्टॉल लावण्यात आले होते.कार्यक्रमाला पिपरीया सशस्त्र दुर क्षेत्रातील गुलाबटोला, गल्लाटोला, देवारीटोला व अन्य गावातील नागरिक, कचारगड आदिवासी आश्रमशाळा पिपरीया, जिल्हा परिषद प्राथमिक शाहा पिपरीया, सालेकसा आदिवासी शासकीय वसतीगृह, पंचशील हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मक्कटोला, पिपरीया हायस्कूल येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कलावंत जीवन लंजे यांनी तुमडी गीत,गांगला येथील मुलांनी दंडार तर काही शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यशस्वीतेसाठी सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, पोलीस उपनिरीक्षक श्री शेख, सशस्त्र दुर क्षेत्र पिपरीयाचे पोलीस कर्मचारी, सी-६० चे जवान यांनी परिश्रम घेतले.