तिरुपती राईसमिलची ५८ लाख ६0 हजारात विक्री

0
8

मोहाडी,दि.२५:स्थानिक मोहगावदेवी येथिल तिरुपती राईस मिलचे संचालक विजय महादेवराव खोब्रागडे व इतर रा. भंडारा शासनाचे थकबाकीदार झाल्याने तसेच रक्कम अदा न केल्याने राईस मिल लिलावात काढण्यात आली. यात सर्वाधित ५८ लाख ६0 हजार रुपयांची बोली लावण्यात येऊन लिलाव पूर्णकरण्यात आला.
विजय महादेवराव खोब्रागडे व इतर यांनी जिल्हा औद्योगिक केंद्राकडून सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत २४ लाख ४८ हजार ६00 रुपयांचे अनुदान घेतले होते. सदर रक्कम विहीत मुदतीत भरणे आवश्यक असताना त्यांनी रक्कम भरली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी भंडारा यांनी ३७ लाख २४ हजार १५ रुपये वसूल करण्याचे पत्र तहसीलदार मोहाडी यांनी पाठविले. दरम्यान, तहसीलदारांनी राईस मिल यंत्रसामुग्रीसहीत जप्त केली होती. संपूर्णप्रक्रियेनंतर १९ जानेवारीला तिरुपती राईसमिलचा लिलाव करण्यात आला. या लिलावात सर्वाधिक ५८ लाख ६0हजार रुपयांची बोली नितीन आनंदराव निर्वाण यांनी लावल्याने स्विकार करण्यात आली. येथील अनेक शेतकर्‍यांचे पैसे या राईसमिलकडे थकीत असल्याचे बोलले जाते. मात्र, गरीब शेतकर्‍यांकडे ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने ते हतबल झाले आहेत.