बीएसएफ जवानाची पोलिसाच्या मोटारसायकला धडक, तिघांना गंभीर दुखापत

0
10

देसाईगंज,दि.२७: आजारी आईच्या भेटीसाठी कुटुंबीयांसह जात असलेल्या पोलिसाच्या मोटारसायकलला बीएसएफ जवानाने जबर धडक दिल्याने तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना आज दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास देसाईगंज-आरमोरी मार्गावरील जेजानी पेपरमिल जवळच्या अवतार सिमेंट प्रॉडक्टसमोर घडली.
देसाईगंज पोलिस ठाण्यात कार्यरत सतीश खरकाटे हे आपल्या एम. एच. ३३ आर. ६६१५ या मोटारसायकलने पत्नी अस्मिता(३९), मूलगी शर्वरी (९) व शरयू (३) यांच्यासह आजारी आईच्या भेटीसाठी आरमोरीला जात होते. जेजानी पेपरमिल जवळच्या अवतार सिमेंट प्रॉडक्टसमोर पोहचताच मागून भरधाव वेगाने येत असलेल्या बीएसएफ जवानाने खरकाटे यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात सतीश खरकाटे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. बीएसएफ जवान मंगेश मडावी (३०) तसेच त्याच्या मागे बसलेला नरेंद्र वझाडे (४०) दोघेही रा.जोगीसाखरा हेदेखील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यांना गड़चिरोलीला हलविण्यात आले. सतीश खरकाटे यांची पत्नी अस्मिता खरकाटे, मुलगी शर्वरी खरखाटे व शरयू खरकाटे यांना किरकोळ मार लागल्याने उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली.
धडक दिल्यानंतर बीएसएफ जवानाने खरकाटे यांच्या मोटारसायकलला फरफटत नेले. त्यामुळे खरकाटेंची मोटारसायकल समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या समोरच्या चाकाखाली आली. परंतु ट्रॅक्टर चालकाने चक्क ब्रेकवर उभा राहून ट्रॅक्टर जागेवरच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.