राज्यातील पहिल्या संगणकीकृत सात-बारा एटीएम व्हेंडींग मशीनच्या शुभारंभ

0
9

नागपूर दि.२७:: शेतकऱ्यांना आपल्या शेतीसंदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सात-बारा या दस्तावेजासाठी तलाठ्यांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. संगणकीकृत व प्रमाणित सात-बारा एटीएम व्हेंडिंग मशीनच्या सहाय्याने तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या राज्यातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते झाला.
नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात सात-बारा व्हेंडिंग एटीएम मशीनद्वारे केवळ 20 रुपये वरून अद्ययावत संगणीकीय सात-बारा उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी एटीएम सात-बारा ही अभिनव संकल्पना नागपूर जिल्ह्यात राबवायला सुरुवात केली असून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात एटीएम व्हेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना नागपूर जिल्हा प्रशासनातर्फे पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून अभिनव भेट असल्याचे सांगताना विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, जनतेला सात-बाराचा उतारा सुलभ व एक मिनिटात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत आहे. हा उपक्रम म्हणजे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हे यंत्र मंडल अधिकारी कार्यालयापर्यंत बसविल्यास जनतेला सात-बारासाठी त्रास होणार नाही. सात-बारा मिळविण्यासाठी अत्यंत सुलभ व सुटसुटीत प्रक्रिया असून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केलेल्या कार्याचा गौरव विभागीय आयुक्तांनी केला.
गोधनी येथील शेतकरी सिद्धेश्वर कोळे यांनी एटीएम मशीमध्ये 20 रुपये जमा करुन आपल्या शेतीचा सात-बारा घेतला. यापूर्वी सात-बारासाठी तलाठ्याकडे जावे लागत होते. एटीएमवर सात-बारा मिळत असल्यामुळे सुविधा झाल्याचे यावेळी सिद्धेश्वर कोळे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वागत करुन सात-बारा एटीएएम व्हेंडिंग मशीनबाबत माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के. एन. के. राव, उपजिल्हाधिकारी गिरीष जोशी, उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, एनआयसीच्या श्रीमती क्षमा बोरोले, उप जिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शिरीष पांडे, अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे, एनआयसीचे खोब्रागडे तहसीलदार बन्सोडे आदी अधिकारी उपस्थित होते.