आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू

0
17

तिरोडा दि. ३१ : रविवार, २९ जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सोमवारी मेंढा शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतकाचे नाव रवींद्र चैतराम टेकाम (१४) असे असून तो मेंढा येथील रवींद्रनाथ टागोर निवासी आश्रमशाळेचा विद्यार्थी आहे.
रावणघाटा/मेंढा येथील रवींद्रनाथ टागोर निवासी आश्रमशाळा येथील इयत्ता आठवीचे चार विद्यार्थी जवळील मेंढा येथील इंदिरा कृषी विद्यालयातील स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम पाहायला गेले होते. यापैकी तीन विद्यार्थी शाळेत परत आले, मात्र रवींद्र चैतराम टेकाम हा विद्यार्थी शाळेत परत आलाच नाही, हे दररोजप्रमाणे सायंकाळी मुलांची हजेरी घेताना अधीक्षक टिकमचंद बावनथडे यांच्या लक्षात आल्याने तत्काळ त्यांनी मुलाच्या गावी त्याच्या वडिलांना फोनवरून कळविले.दरम्यान रविवार व सोमवारला त्याचा शोध सुरू होता. याप्रकरणी तिरोडा पोलिसांना सूचना देण्यात आली होती. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सकाळी ११ वाजता जेवण झाल्यानंतर प्रशांत सूरजलाल मरस्कोल्हे, सतीश देवेंद्र भलावी, अमिन राधेश्याम वाढवे व रवींद्र चैतराम टेकाम हे चार विद्यार्थी ठाणेगाव येथील इंदिरा कृषी विद्यालय मेंढा येथे स्नेहसंमेलन पाहून खारूताई पकडण्याकरिता गेले असता बळीराम कनोजे (ठाणेगाव) यांच्या शेतातील विहिरीत रवींद्र पडला. त्याला वाचविण्याचा प्रय▪मित्रांनी केला; परंतु ते यशस्वी झाले नाहीत, मात्र त्यांनी भीतीमुळे ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. सोमवारी दुपारी इतर विद्यार्थ्यांना विचारपूस केली असता त्यांनी घडलेली घटना सांगितल्यावरून शाळेचे मुख्याध्यापक विजय बघेले यांनी तिरोडा पोलिसांना माहिती दिली. तिरोड्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. गळ घालून शोध घेतला असता रवींद्रचा मृतदेह विहिरीत आढळला.मृतदेहाचा पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे आणण्यात आला, मात्र सायंकाळ झाल्याने शवविच्छेदन मंगळवारी करण्यात येईल, असे उपजिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.