राज्यस्तरीय समिती एकाच दिवसात परतली

0
9

चंद्रपूर दि. 2 – : स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यस्तरीय तपासणी समितीने आपला नियोजित चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा दोन दिवसांचा दौरा सहलीसारखा एकाच दिवशी आटोपला असून या दौऱ्यादरम्यान समितीने घाईगर्दीत हागणदारीमुक्त परिसर, सार्वजनिक शौचालये तसेच शाळांची पाहणी केली.स्वच्छ भारत अभियानाच्या केंद्रीय समितीने प्रात्यक्षिकावर भर न देता दोन दिवस सर्व भागांचा दौरा करून गुणांकन केले. मात्र राज्यस्तरीय तपासणी समितीने प्रत्यक्ष पाहणीवर अधिक भर न देता प्रात्यक्षिक पाहून समाधान मानले. मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत दौरा आटोपून समितीने रात्रीचा मुक्काम बल्लारपुरात ठोकला. बुधवारी भल्या सकाळी समिती नागपूरच्या दिशेने रवाना झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर या अभियानातंर्गत चंद्रपूर शहर स्वच्छ आणि हागणदारीमुक्त करण्याच्या दिशेने महानगरपालिका प्रशासन कामाला लागले आहे. मार्च २०१७ अखेर चंद्रपूर शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. या अभियानातंर्गत महानगरपालिकेने काय प्रगती केली याची पाहणी करण्यासाठी गेल्या महिन्यात केंद्रीय स्वच्छता समितीने दौरा केला होता. आता राज्यस्तरीय समितीने दौरा केला. या समितीत नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्धीकी, नागपूर विभाग आयुक्त कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक संचालक (नगरपालिका प्रशासन) कैलास झंवर, पत्रकार कार्तिक लोखंडे, वर्धा येथील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे किशोर भोयर आणि प्रवीण तडस यांचा समावेश आहे.

ही समिती सोमवारी रात्री चंद्रपुरात दाखल झाली. समितीचा ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी असा दोन दिवसांचा नियोजित दौरा होता. मात्र, सोमवारी रात्री आलेल्या समितीने मंगळवारी दिवसभर सहलीप्रमाणे शहरातील काही भागांना भेटी दिल्या. बिनबा गेटच्या बाहेरील भाग, विठ्ठल मंदिर परिसरातील खिडकी, झरपट नदी, जटपुरा गेट, रामाळा तलाव, बाबुपेठ रेल्वे लाईन आणि जलनगरमधील हागणदारीमुक्त परिसराची पाहणी केली. तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या गौतमनगर, जटपुरा गेट, महाकाली मंदिर आणि बुरडकर मोहल्ल्यातील सार्वजनिक शौचालयाचीसुद्धा पाहणी केली. तुकूममधील मातोश्री विद्यालय आणि महानगरपालिकेच्या दोन शाळांना भेटी देवून तेथील स्वच्छतेची पाहणी केली. तत्पूर्वी सकाळी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत समितीची बैठक झाली. या बैठकीत मनपा प्रशासनाने साफसफाई आणि हागणदारीमुक्तीसाठी केलेल्या कामाची प्रात्याक्षिके दाखविली.