नागपूर रेल्वे स्थानकाचा होणार विकास : ‘डीआरएम’ गुप्ता

0
7

नागपूर दि. 2 – : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात पहिल्यांदा रेल्वेसाठी आवश्यक घोषणा केल्या आहेत. परंतु अर्थसंकल्पात मध्य आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला काय मिळाले, याचे उत्तर सध्या रेल्वे प्रशासनाजवळ नाही. विभागाला खूप काही मिळाले असेल असा अंदाज अधिकारी लावत असून, पिंक बुक आल्यानंतर खरी स्थिती स्पष्ट होणार आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अर्थसंकल्पात २५ रेल्वे स्थानकाच्या विकासाची घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वे स्थानकाचा समावेश होऊ शकतो. पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात खूप जागा आहे. येथे विकासाची मोठी शक्यता आहे. नागपूर रेल्वे स्थानकाचा विकास इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करू शकते. ही कंपनी स्मार्ट सिटी प्रोजेक्टनुसार स्टेशनचा विकास करेल.
गुप्ता यांनी सांगितले की, सात हजार रेल्वे स्थानकांना सोलर एनर्जीपासून प्रकाशमान करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १९ रेल्वे स्थानकांचा समावेश होऊ शकतो. ५०० रेल्वे स्थानकांवर लिफ्ट आणि एस्केलेटर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वे स्थानकाचा समावेश होऊन येथे लिफ्ट, एस्केलेटर लावण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यात रेल्वे स्थानकावर चार एस्केलेटर, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्ट लावण्याचा समावेश होता. त्याबाबतची निविदा २३ फेब्रुवारीला उघडण्यात येईल. विभागातील पायाभूत प्रकल्पांसाठी भरपूर निधी मिळणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य शासन मिळून महाराष्ट्रात ७० रेल्वे प्रकल्प साकारणार आहेत. यात नागपूर विभागात किती प्रकल्प राहतील, हे स्पष्ट नाही. अर्थसंकल्पात पर्यटन रेल्वे चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरवरून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ही गाडी नुकतीच स्पेशल रेल्वेगाडीच्या रूपाने चालविण्यात आली होती. या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पत्रकार परिषदेला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्रा, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे आणि अधिकारी उपस्थित होते.