राजेंद्र सिंह : जल चळवळीत सहभागी व्हा!

0
23

नागपूर दि.3 : आज राज्यातील पाणथळांचे जतन करण्याची गरज आहे तसेच नवीन पाणथळ निर्माण करून जमिनीची धूप थांबवून पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे. मात्र या सर्व गोष्टी बोलून नाही तर निसर्गासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने जल चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्घ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केले.
वन विभाग, सामाजिक वनीकरण, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभाग, वनराई सामाजिक संस्था आणि आॅरेज सिटी वॉटर विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जागतिक पाणथळ दिनानिमित्त ‘भविष्यात पाणथळाची उपयोगिता’ या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. हा कार्यक्रम दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई होते. दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात डॉ. एस. व्ही. सी. कामेश्वरा राव, डॉ. सुनिता सिंग, डॉ. यशवंत काटपातल यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात देशभरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी व संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. सी. पवार यांनी केले. सायंकाळी पार पडलेल्या समारोप समारंभाला स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले,राजेंद्र सिंह, स्मारक समितीचे सदस्य व्ही.टी. चिकाटे, वनसंरक्षक डब्ल्यू. आय. अ‍ॅटबोन, किशोर मिश्रीकोटकर, व्ही.टी. चिकाटे व विलास गजघाटे उपस्थित होते