बीडीओ व सहा ग्रामसेवकांची विभागीय चौकशी प्रस्तावित

0
11

चंद्रपूर,दि.3 : चिमूरचे तत्कालीन बीडीओ विनोद जाधव व सहा ग्रामसेवकांवर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. तर या प्रकरणात निलंबित असलेले साहाय्यक लेखाधिकारी वासलवार व तांत्रिक अधिकाऱ्यांवर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चिमूर तालुक्यात झालेल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरुन जिल्हास्तरीय चौकशी समितीकडून तपासणी करण्यात आली. समितीने दिलेल्या अहवालावरुन या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर साहायक लेखाधिकारी वासलवार यांना निलंबित करुन गटविकास अधिकारी विनोद जाधव व कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्यांना कारणे दाखावा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने ही चौकशी प्रस्तावित करण्यात आली.

मग्रारोहयोअंतर्गत चिमूर तालुक्यात सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षात अनेक कामे झाली. या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर स्थायी समितीच्या सभेतही यासंदर्भातील मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदर कामांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय चौकशी समिती गठीत केली होती. या समितीकडून १३ आॅक्टोबर २०१६ रोजी अहवाल प्राप्त झाला. समितीने चौकशीदरम्यान, निवडक सात ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली होती. चौकशी अहवालाप्रमाणे ग्रामपंचायतींमध्ये ई- टेंडरींग न करणे, विना परवाना गौण खनिज उत्खनन व पुरवठा करणे, आहरण, संवितरण व लेखांकनाची कार्यपद्धती न अवलंबिता देयके निकाली काढणे, साहित्याचा दर्जा न तपासता मोजमाप व मुल्यांकन केले असल्याचे स्पष्ट झाले होते. यासाठी संबंधित ग्रामसेवक, कंत्राटी तांत्रीक अधिकारी, कंत्राटी लेखापाल, साहाय्यक लेखाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नोटीसचे उत्तम असमाधानकारक असल्याने चिमूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी जाधव व साहाय्यक लेखाधिकारी वासलवार यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. दरम्यान, वासलवार यांना निलंबित करण्यात आले. तर गदगाव ग्रामपंचायतीचे सचिव एस. बी. राऊत, पुयारदंड व गडपिपरी ग्रा.पं. चे सचिव एल. आर. मिसाळ, मानेमोहाळीचे सचिव बी. एम. पेंदोर, चिचाळा शास्त्रीचे सचिव आर. डी. चांदेकर, मदनापूरचे सचिव व्ही.एच. झिले व खानगाव ग्रा.पं. चे सचिव एम. एन. दुर्गे यांच्यावर सुद्धा विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. कंत्राटी तांत्रीक अधिकारी व साहाय्यक लेखाधिकाऱ्यांवर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आलेला आहे.