हळदवाहीत वन विभागाचा पुढाकार :पाच खोदतळ्यांची निर्मिती

0
7

चामोर्शी berartimes.com दि.०६: तालुक्यातील हळदवाही व हळदवाही टोला गावातील ७५ टक्के शेतकऱ्यांना कन्नमवार जलाशयाचे पाणी मिळते. परंतु उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने वन विभागाच्या वतीने पुढाकार घेऊन परिसरात पाच खोदतळ्यांची निर्मिती जानेवारी महिन्यात करण्यात आली.
पावसाचे पाणी कितीही पडले तरी ते अडविण्याची सोय नसल्याने पाणी वाहून जाते. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. जलसंवर्धन करणे गरजेचे असतानाच वन विभागाने पुढाकार घेऊन चामोर्शी वन परिक्षेत्रातील हळदवाही नाल्यालगतच्या संरक्षित वनात पाच खोदतळ्यांची निर्मिती जानेवारी महिन्यात करण्यात आली. या खोदतळ्यांमुळे भूजलपातळी वाढून शेतकऱ्यांनाही पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. हळदवाही व हळदवाही टोला गावालगतच्या संरक्षित वनात खंड क्र. ८६२ व ८६३ मध्ये ३० बाय ३० मीटर लांब व रूंद तसेच १० फुट खोल असे पाच खोदतळे निर्माण करण्यात आले. सदर काम पूर्ण झाले आहे. गावातील ७५ टक्के शेतकऱ्यांना कन्नमवार जलाशयाचे पाणी उपलब्ध होत होते. परंतु २५ टक्के शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. परंतु आता पाच खोदतळ्यांची निर्मिती करण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोयही उपलब्ध झाली आहे.सोबतच या खोदतळ्यांमध्ये मत्स्यव्यवसायही करता येणार आहे. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण असून वन विभागाच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेल्या खोदतळ्याच्या कामाचे हळदवाही, हळदवाही टोला येथील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.