अध्यक्षांनी परस्पर पळविला १८ लाखांचा निधी

0
12

नागपूर,berartimes.com दि.०६: जिल्हा परिषदेच्या २0 टक्के सेसफंडाच्या समान वाटप न्यायाला फाटा देत अध्यक्ष निशा सावरकर यांनी आपल्या सर्कलमध्ये १८ लाख रुपयांचा निधी परस्पर पळवून नेल्याने सभापती गेडाम यांच्या अधिकाराला ठेच पोहोचली आहे. उपाध्यक्षांसह इतर सदस्यांनाही निधी न मिळाल्याने ते चांगलेच संतापले आहेत. अध्यक्षांनी परस्पर निधी मंजूर केला असला तरी तो वाटप न करण्याचे आदेश समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी अधिकार्‍यांना दिल्याने आता अध्यक्ष विरुद्ध सभापती असा सामना रंगणार आहे.
दलित वस्ती विकासासाठी सेसफंडातून १ कोटी २७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. समसमान वाटप करण्याचे ठरले असताना अध्यक्ष सावरकर यांनी मात्र अधिकाराचा ‘आगाऊ’ वापर करीत परस्पर १८ लाख रुपयांचा निधी स्वत:च्या सर्कलमध्ये एका गावासाठी पळविला. सध्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारीला होऊ शकली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पारशिवनी आणि वानाडोंगरी सर्कलची नव्याने पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. आचारसंहितेमुळे जि. प. मध्ये विकासकामे ठप्प पडली आहेत. प्रत्येक जि. प. सदस्य आपल्या सर्कलमध्ये कामाला लागले आहेत. जि. प. च्या सेसफंडातून २0 टक्के निधी समाजकल्याण विभागाला दलित वस्त्यांच्या विकासासाठी दिला जातो. हा निधी १ कोटी २७ लाखांचा आहे. समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांना अंधारात ठेवून अध्यक्षांनी १८ लाख रुपये त्यांच्या सर्कलमधील मारोडी गावाच्या विकासासाठी पळवून नेला. या निधीतून उपाध्यक्षांना एक पैसाही देण्यात आलेला नाही. याशिवाय पारशिवनी सर्कलचे भाजप नगरसेवक कमलाकर मेंघर यांनाही निधी मिळाला नाही. त्यामुळे ते सुद्धा संतप्त आहेत. सभापती गेडाम व इतर सदस्यांना अंधारात ठेवून अध्यक्षांनी परस्परच निधीचा कार्यक्रम केल्यामुळे खुद्द सभापती गेडाम बुचकळय़ात पडले आहेत. या प्रकाराची माहिती होताच गेडाम यांनी ‘निधी वितरीत न करण्याचे’ निर्देशच वित्त व लेखा अधिकार्‍यांना दिले आहे. त्यामुळे या निधीवरून येत्या काही दिवसांत अध्यक्ष सावरकर विरुद्ध सभापती गेडाम असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.