गडचिरोली दि. 7 -: जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वेगवेगळय़ा मतदारसंघात निवडणूक साहित्य, निवडणूक कर्मचारी पोहोचविणो व त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी पोलीस कर्मचारी पोहोचविणो यासाठी गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांना १३ ते २३ फेब्रुवारी या कालावधीसाठी २ मोठे हेलिकॉप्टर्स (एमआय -१७) व २ बाऊजर पुरविण्यात येणार असल्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १६ व २१ फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यांत मतदानप्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यातील काही परिसर अतिदुर्गम आहे. त्याचप्रमाणो बहुतांश भाग उंच टेकड्या व जंगलव्याप्त असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची साधने अपुरी आहेत. या भागांमध्ये नक्षलवादी चळवळही सक्रिय आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पाडण्याकरिता पोलीस अधीक्षकांना हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर केंद्र शासनाकडून भाड्याने घेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील निवडणुका शांततेत पार पाडण्यास मदत होणार आहे.




