देवरी-मंगेझरी रस्ता बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर

0
23

देवरी दि. 7 -: देवरी ते मंगेझरी या १२ किमी अंतराच्या रस्ता बांधकामाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उघडपणे पाहवयास मिळत आहे. बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्यांचा वापर होत आहे. असे असले तरी संबंधीत विभागाचे अभियंता मात्र, कंत्राटदाराला अभयदान देत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करून तुर्त काम थांबविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरी उपविभागांतर्गत देवरी ते मंगेझरी या १२ किमी रस्त्याचे बांधकामाचे कंत्राट अंदाजे ४ ते ५ कोटीच्या निधीमध्ये देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटमध्ये नमूद अटी-शर्थीनुसार रस्त्याचे बांधकाम केले जात नसल्याचे समोर आले आहे. बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे. वापरण्यात येणारी गिट्टी भुसभुसीत आहे. त्याच प्रमाणे मुरूम ऐवजी माती मिश्रीत मुरूमचा वापर केला जात आहे. बांधकाम दरम्यान गिट्टी रस्त्यावर टाकल्यावर रोडरोलरच्या माध्यमातून दाबत असताना गिट्टी पुर्णत: भुसभुसीत असल्यामुळे चुरा होत आहे. यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून उघडपणे होत असतानाही परिसरातील जनप्रतिनिधी मात्र, याकडे डोळेझाक करीत आहेत. तसेच संबंधीत विभागाचे अभियंता सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत.रस्ता बांधकामातील भ्रष्टाचार तुर्त लगाम लावण्याची गरज आहे. म्हणून विभागाने भ्रष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.