३१ मार्च पर्यंत अटल महापणन विकास अभियान, १० फेब्रुवारीला कार्यशाळा

0
37

गोंदिया,दि.९ : राज्यातील सहकारी पणन महासंघ, जिल्हा/तालुका खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या बळकटीकरणासाठी शासनाने राज्यात अटल महापणन विकास अभियान ३१ मार्च २०१६ अखेर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व खरेदी विक्री संघ यांच्या कामात सुधारणा करुन त्यांचे बळकटीकरण करणे व पणनच्या या त्रिस्तरीय रचनेच्या बळकटीकरणातून राज्यातील शेतकऱ्यांना कृषि पणन विषयक सुविधा देवून आर्थिक उलाढाल वाढविणे हे आहे.
या अभियानाअंतर्गत गावातील १०० टक्के शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सभासद करुन घेणे. तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला तालुका खरेदी विक्री संघाचा सभासद करुन घेणे. राज्यातील प्रत्येक खरेदी विक्री संघ व प्रक्रिया संस्था पणन महासंघाचे सभासद असणे आणि पणन महासंघाचे सर्व उपक्रम, खरेदी विक्री संघाचे सर्व उपक्रम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीद्वारे राबविणे. ‍िनयमाप्रमाणे या संस्थानी इतरांकडे असणाऱ्या त्यांच्या थकीत रकमांची वसूली करणे, पणन महासंघ व इतर संस्थाची गोदामे याचा वापर पूर्ण क्षमतेने करणे इत्यादीच्या माध्यमातून स्वत:चे खेळते भांडवल उभे करणे व आर्थिक स्थिती सुधारणे. पणन महासंघाने या संस्थांच्या माध्यमातून कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मदतीने किमान आधारभुत किंमत योजना व भाव स्थिरता निधी योजनेअंतर्गत खुल्या बाजारात अन्नधान्य गतीमान करणे. पणन महासंघाने त्यांच्या स्वत:च्या खत कारखान्याचा भागीरथ खताचे व पशुखाद्य कारखान्याचे वैभव पशुखाद्याचे उत्पादन वाढवून या सभासद संस्थाच्या माध्यमातून विक्री वाढविणे. या संस्थांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषि निविष्ठा जसे- रासायनिक खते, जैविक खते, सेंद्रीय खते, बुरशीनाशके, तणनाशके, किटकनाशके, बियाणे, कृषि अवजारे इत्यादीची खरेदी विक्री वाढविणे. या संस्थांनी शासनाच्या इतर योजना जसे- रेशन दुकान, आंगणवाडी, प्राथमिक शाळा, आश्रमशाळा यांना पोषण आहार पुरवठा इत्यादीमध्ये सक्रिय सहभाग घेवून उत्पन्न वाढविणे. कृषि मालाची खरेदी करुन स्वच्छता प्रतवारी करुन त्यांचे पॅकेजींग, लेबलिंग, बॅडिग करुन विक्री करणे यतसेच गरजेप्रमाणे जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्री वा इतर कोणत्याही तत्सम क्षेत्रात संस्थांची आर्थिक उलाढाल वाढविणे. सहकाराचे छोटे रुप असणाऱ्या महिला स्वयंसहायता बचतगटाची उत्पादने व रोपाची विक्री या संस्थाद्वारे करुन सहकारी पणन व्यवस्था विकसीत करणे असे आहे.
या निमित्ताने अटल महापणन विकास अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.गोंदिया येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी व संचालक व्यवस्थापक, सदस्य, खते बियाणे उत्पादकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था गोंदिया यांनी केले आहे.
०००००