वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी मिळणार ‘महसूल’ची जमीन

0
27

गडचिरोली दि.९-: वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेली जमीन संपादन करण्यासाठी महसूल विभाग, वन विभाग तसेच रेल्वे विभाग यांच्यातर्फे संयुक्तरित्या सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मार्गावरील लहान, मोठे पूल उभारून रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यासाठी महसूल विभागाच्या अखत्यारित असलेली जमीन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अथवा मार्च च्या पहिल्या आठवड्यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाला विकास कामासाठी आगावू ताबा देण्याची कार्यवाही जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिली.
जिल्हाधिकारी नायक यांनी ८ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी देसाईगंज येथे वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी महसूल विभाग, वन विभाग तसेच रेल्वे विभागाची संयुक्त बैठक घेतली. यावेळी वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोदर नान्हे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता एम.सी.पात्रा तसेच कार्यकारी अभियंता गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी नायक पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी शासकीय जमीन संपादन करण्यापुर्वी रेल्वे, वन व महसूल विभागाचा संयुक्त सर्वेक्षण होणो अत्यावश्यक आहे. सदर सर्वेक्षणाचे काम अंतीम टप्प्यात पोहचले आहे. प्रस्तावित संपूर्ण जमिनीचा ‘सर्च रिपोर्ट’ संदर्भात माहिती घेणो सुरू झालेले आहे. सदर जबाबदारी गडचिरोली व देसाईगंज उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सोपवली असून खोब्रागडी, गाढवी व कठाणी नदीवरील मोठे पूल या मोठ्या नद्यांसह लहान-मोठे नदी, नाले, इटिया डोह कालवातील पाणी सरळमार्गे वाहण्यास्तव भूमिगत पूल, आवश्यक त्याठिकाणी पाईप लाईन टाकणो, याकरिता महसूल विभागाची जमीन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी दिली. शेतकरी तसेच खाजगी जमीन रेल्वे मार्गासाठी थेट खरेदी प्रक्रिया राबवित असून ऑनलाईन प्रक्रिया राबविल्या जाणार आहे.