स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून करणे आवश्यक

0
19

बोंडगावदेवी : / महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ व सुंदर भारत घडविण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या स्वच्छ ग्राम योजनेची सुरूवात प्रत्येकाने स्वत:पासून, स्वत:च्या घरापासून, गावापासून करणे आवश्यक आहे.तरच आपला देश स्वच्छ होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य मधुकर मरस्कोल्हे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती अर्जुनी/मोरगाव यांच्यावतीने ग्रामपंचायत देवलगाव येथे दि.२५ डिसेंबर रोजी स्वच्छ ग्राम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी मेळाव्यामध्ये पंचायत समितीचे उपसभापती पोमेश्‍वर रामटेके, पं.स. सदस्य किशोर तरोणे, महादेव बोरकर, गटविकास अधिकारी जी.डी.कोरडे, विस्तार अधिकारी वलथरे, विस्तार अधिकारी भूरे, सरपंच तुकाराम सोयाम, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या समाजशास्त्र तज्ञ दिशा मेश्राम, क्षमता बांधणी तज्ज्ञ देवानंद बोपचे, आयईसी तज्ज्ञ राजेश उखळकर, गटसमन्वयक हेमराज अंबुले यांचेसह त्या क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, प्रत्येक ग्रामस्थांनी जर स्वत:च्या घराची जरी स्वच्छता केली तर रस्त्यावर घाण होणार नाही आणि आपले गाव स्वच्छ होईल. पर्यायाने आपला तालुका, जिल्हा स्वच्छ, सुंदर व निर्मल होईल.येत्या नविन वर्षाची पहाट आपण स्वच्छ सुंदर करण्याचा असा संकल्प आज या मेळाव्यानिमित्त करूया असे आवाहन उपसभापती रामटेके यांनी केले. सर्वांनी मिळून सहकार्य केले तर कोणतेही काम यशस्वी होते. यासाठी लहान मुलांवर स्वच्छतेचे संस्कार होणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पं.स. सदस्य महादेव बोरकर यांनी केले. यावेळी भिवखिडकीचे पं.स.सदस्य किशोर तरोणे म्हणाले की, स्वच्छ ग्राम योजनेत ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने सहभागी होऊन स्वत: कृती करणे आवश्यक आहे.
गटविकास अधिकारी कोरडे म्हणाले की, या योजनेमध्ये गावातील महिला, पुरूष व युवकांसोबतच मुलांनीही स्वच्छतेचा संकल्प करून सहभाग घ्यावा.जेणेकरून हे अभियान यशस्वी होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कक्षातील दिशा मेश्राम समाजशास्त्रज्ञ यांनी केले. संचालन देवलगाव येथील शाळेचे शिक्षक यांनी केले. आभार विस्तार अधिकारी वलथरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी गटसमन्वयक हेमराज अंबुले, ग्रामपंचायत देवलगावचे सरपंच, उपसरपंच, सचिव, सर्व सदस्य, शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, पं. स.चे अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.