‘आपले सरकार’ जनतेसाठी ठरतेय फायद्याचे : रहांगडाले

0
8

तिरोडा दि. 20: राज्यात फडणवीस सरकारने सुरू केलेले ‘आपले सरकार पोर्टल’ हे जनतेच्या फायद्याचे ठरत असून तालुक्यातील आतापर्यंत दोन समस्यांचे निराकरण होऊन त्यांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत. यामध्ये डोंगरगाव/खडकी येथील गोवर्धन भाऊजी पटले यांचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जून २0१६ पासून एकूण १२ हजार ७९६ रुपये खात्यात जमा न झाल्यामुळे गोवर्धन पटले यांनी वारंवार संपर्क साधला असता १५ दिवसाचा कालावधी देण्यात आला. परंतु १५ दिवसाचे ८ महिने लोटूनही त्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यामुळे गोवर्धन पटले यांनी आमदार विजय रहांगडाले यांचे स्विय साहाय्यक विवेक ढोरे यांच्याशी संपर्क साधला असून संबंधित यंत्रणेला दिलेल्या कार्यालयीन पत्रावर जिल्हाधिकारी रोहयो यांच्याकडे तसेच शिफारसपत्रासह ‘आपले सरकार’ या पोर्टलवर तक्रार नांदविली असता त्वरित कार्यवाही होऊन जिल्हाधिकारी रोहयो यांच्यातर्फे आदेशित करून २0 दिवसाच्या आत गोवर्धन पटले यांच्या खात्यावर पगाराचा पहिला हप्ता म्हणून ५ हजार ९४ रुपये जमा करण्यात आले. तसेच दुसरा हप्ता मार्चअखेर जमा करण्याचे आश्‍वासन दिले. त्याचप्रमाणे मौजा गांगला येथील मग्रारोहयो अंतर्गत २0१५-१६ चे रस्ता बांधकामाचा निधी ३.३४ लाख वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा निधी जमा न झाल्यामुळे आमदार रहांगडाले यांचे स्विय सहा. विवेक ढोरे यांच्या मदतीने आपले सरकार या पोर्टलवर तक्रार दाखल केल्यानंतर ३५ दिवसाच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत गांगलाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्यामुळे आपले सरकार पोर्टल जनतेसाठी फायद्याचे ठरत आहे. तसेच यापुढेही जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार विजय रहांगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.