26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ मार्चपासून आधार कार्ड व बँक खाते क्रमांक असणाऱ्यांनाच होणार शिधावस्तुंचा पुरवठा

मार्चपासून आधार कार्ड व बँक खाते क्रमांक असणाऱ्यांनाच होणार शिधावस्तुंचा पुरवठा

0
35

गोंदिया,दि.२७ : जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकांचे आधार सिडींगचे काम अंतिम टप्प्यात आहे. यापुढे रास्तभाव दुकानातून ज्या शिधापत्रिकाधारकांनी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व त्यांचा मोबाईल क्रमांक दिला आहे त्यांनाच शिधावस्तुंचे वितरण शिधावाटप दुकानातून होईल. त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप त्यांचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक रास्तभाव दुकानात जमा केले नसतील त्यांनी त्वरित आपले आधार क्रमांक रास्तभाव दुकानाकडे जमा करावे. अन्यथा नाईलाजास्तव अशा शिधापत्रिकाधारकांचा सर्व शिधावस्तुंचा पुरवठा बंद करण्यात येईल याची सर्व शिधापत्रिकाधारकांनी नोंद घ्यावी.
ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस कनेक्शन नाही असे शिधापत्रिकाधारक केरोसीन मिळण्यास पात्र आहेत व अशाच शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचा पुरवठा करण्यात येत आहे व केरोसीन मिळण्यास पात्र आहेत. सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक तात्काळ सादर करावे. भ्रमणध्वनी शक्यतो कुटुंब प्रमुखाचा असावा. कुटुंब प्रमुखाकडे भ्रमणध्वनी नसल्यास कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक चालू शकेल. जे शिधापत्रिकाधारक अशाप्रकारे आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक सादर करणार नाहीत त्यांना यापुढे अनुदानीत दराचा कोटा देण्यात येणार नाही. अशा लाभार्थ्यांचा कोटा राखून ठेवण्यात येईल. केरोसीन मिळण्यास पात्र सर्व शिधापत्रिकाधारकांनी १० मार्च २०१७ पर्यंत त्यांचे आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक तहसिल कार्यालय व संबंधित रास्तभाव दुकानदार व केरोसीन विक्रेते यांचेकडे जमा करावे.
यापुढे प्रत्येक रास्तभाव दुकानात झजड मशीनद्वारे धान्य पुरवठा होणार असल्याने व असा प्रयोग जिल्ह्यात दोन ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्याने याकरीता आधार क्रमांक अत्यावश्यक असल्याने तातडीने शिधापत्रिकाधारकांनी आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक जमा करावे. यापुढे रेशन दुकानात आधार क्रमांक हीच ओळख ठरणार आहे. आधार कार्ड नाही तर धान्य पुरवठा नाही याप्रमाणे ज्यांनी अद्याप देखील आधार क्रमांक काढले नसतील त्यांनी सुध्दा तहसील कार्यालयात जावून आपले आधार कार्ड, बँक खाते त्वरीत काढून घ्यावे. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही आधार क्रमांकावर आधारीत वितरण व्यवस्था होणार असल्याने सर्व शिधापत्रिकाधारकांनी याची नोंद घ्यावी.जिल्ह्यात सर्व रेशन दुकानातून मार्च अखेर पर्यंत झजड मशीनद्वारे धान्य वितरीत होणार असल्याने व ही यंत्रणा आधार क्रमांकावर आधारीत असल्याने त्वरित आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक जमा करावे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया यांनी केले आहे.