नागपूर दि.28 : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्या ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप विविध पक्षाचे नेते आणि पराभूत उमेदवारांनी केला. यासंदर्भातील एक व्हीडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे रविवारी दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती. तर सोमवारी (२७ फेब्रुवारी) रोजी प्रभाग २२ आणि प्रभाग ६ मधील उमेदवारांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. या ईव्हीएम मशीनमध्ये कोणत्याही चिन्हा समोरील बटण दाबले असता कमळाचे लाईट लागत होते. यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये मोठय़ा प्रमाणात गडबडी असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्रभाग एक मधील पराभूत उमेदवार नितीन नागदेवते यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.महापालिकेच्या निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये अनियमितता आणि घोटाळा झाला. याचा फटका आम्हाला बसला आहे, असा पराभूत उमदेवारांचा आरोप आहे. या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय या सर्वांनी घेतला आहे.
नागदेवते म्हणाले, प्रभाग क्र. १ मधील बहुजन समाज पार्टीच्या चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. हा प्रकार पाहून आम्हीही धास्तावलो. निवडणूक सुरू असताना आक्षेप घेतला. यामध्ये ईव्हीएम उमेदवारांच्या निवडणुकी यादीतील क्रमांकप्रमाणे मशीनमध्ये उमेदवारांचा क्रम नव्हता. काही केंद्रावर पैसा वाटण्यात येत होते, सुप्रीम कोर्टाचे निर्णयानुसार मतदान झाल्यावर एक चिट्टी बाहेर येत असल्यामुळे आपले मत कुणाला दिले ते कळत होते. मात्र मशीनमधून चिट्टी बाहेर निघत नसल्याने हे कळण्यास मार्ग नव्हता. उत्तर नागपूरचे आमदार नारा येथील केंद्रावर ठिय्या देऊन बसले होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अशाप्रकारे अनेक प्रकारे या निवडणुकीत आणि मशीनमध्येही गडबडी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मनपा निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पत्रपरिषदेला अंजना ठाकरे, कविता लांडगे, मनीष बंसोड आदी उपस्थित होते.
शनिवारी हॉटेल जॅक्सनमध्ये काँग्रेसचे नेते नगरसेवक सुरेश जग्यासी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रमन ठवकर व ईश्वर बाळबुधे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांची आणि पराभूत उमेदवारांची बैठक झाली. तर रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमुळे गहजब माजला. सोमवारी प्रभाग क्रमांक २२ मधील उमेदवार वंदना इंगोले यांच्यासह सर्व उमदेवारांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. असलम खान आणि बंडू तळवेकर या उमदेवारांनीही तक्रार दिली आहे. बुथनिहाय आकडेवारी त्यांनी मागितली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पूर्व नागपुरातील पदाधिकारी अब्दुल कादीर शेख यांनी विभागीय आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना पत्र पाठविले आहे. निवडणुकीत मोठा घोळ झाला असून या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग (सीबीआय) किंवा विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम मशीन नव्हे, तर बॅलेट पेपरचा वापर करावा, अशी मागणी शिवसेनेचे पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख प्रदीप तुपकर यांनी आयोगाकडे केली आहे.




