अमरावती दि. 28 : महापालिका निवडणुकीत ‘ईव्हीएम’मध्ये घोळ केल्याच्या संशयाने अमरावतीत सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. त्या अनुषंगाने सोमवारी खा.आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन दिले. याबाबत लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार असून, राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडेही दाद मागणार असल्याची माहिती खा.अडसूळ यांनी दिली.
गतवेळी केवळ सात सदस्य असणार्या भाजपाचे यावेळी ४५ सदस्य महापालिकेत पोहोचले आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षांतील अनेक उमेदवारांना मिळालेले अत्यल्प मतदान संशयास्पद आहे. यामुळे गत दोन दिवसांपासून वेगवेगळय़ा पद्धतीने भाजपा सरकारविरोधात रणनीती आखली जात आहे. सोमवारी खा.अडसूळ यांच्या नेतृत्वात इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन भाजपा सरकारचा निषेध करण्यात आता. आता बॅलेट पेपरद्वारे फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी मोर्चेकर्यांनी लावून धरली. यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, युवा स्वाभिमान, मुस्लीम लीग आदी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





