गोरेगाव दि.०१ मार्च : यापुढे मच्छीमार संस्थांकडे २00 हेक्टरवरील जलाशय आणि १00 हेक्टरवरील तलाव राहणार नाहीत. केवळ खाजगी कंपन्या आणि कंत्राटदार यांच्या हिताचे निर्णय शासन घेत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाप्रमाणे मासेमारी करणारेसुद्धा आत्महत्या करतील, अशी भीती भटक्या विमुक्तांच्या मेळाव्यात दीनानाथ वाघमारे यांनी आपल्या उद््घाटनपर भाषणात व्यक्त केली.
संघर्ष वाहिनी भटक्या विमुक्तांची संघर्ष परिषद, जिल्हा शाखा गोंदियातर्फे गोरेगाव तालुक्यातील ग्राम चोपा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी एकलव्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.के.एन.नान्हे तर उद्घाटक म्हणून संघर्ष वाहिनीचे मुख्य संयोजक दीनानाथ वाघमारे, अतिथी लोकचंद शहारे, जयचंद नगरे, मनोरमाबाई शेंडे, ज्योती नागपुरे, कमलाबाई मौजे, कल्पनाबाई मेश्राम, जयेंद्र बागडे मंचावर उपस्थित होते.महिलांची लक्षणीय उपस्थिती असलेल्या या मेळाव्यात मनोरमाबाई शेंडे, ज्योती नागपुरे, विद्यार्थिनी डॉली साऊसकर यांनी व्यसनमुक्ती, रोजगार, शिक्षण व शिष्यवृत्ती भटक्या विमुक्तांसाठी आश्रमशाळा याबद्दल प्रश्न उपस्थित केले. कोमेश कांबळे, मोरेश्वर कांबळे, जिल्हा संयोज माणिक गेडाम यांनीही विविध समस्यांचा ऊहापोह केला. तर संघटित होऊन सरकारशी दोन हात करण्याचा इशारा प्रा.के.एन.नान्हे यांनी दिला.संचालन परेश दुरूगवार, प्रस्तावना सुंदरलाल लिल्हारे तर आभार लोकचंद शहारे यांनी मानले. आयोजनासाठी किसन मेश्राम, लोकराम मेश्राम, रेखा मोहनकर, पूजा चाचेरे, यमुनाबाई नागपुरे, लीलाबाई मेश्राम, पुष्पकला मेश्राम, धनलाल कावळे आदींनी सहकार्य केले.





