निधीअभावी रखडले आमगाव तहसील इमारतीचे बांधकाम

0
10

महेश मेश्राम
आमगाव
दि.०१ मार्च : येथील तहसील कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने नव्या इमारतीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला होता. यानंतर इमारत बांधकामाला सुरुवातदेखील झाली. मात्र, या इमारत बांधकामात आता अपूर्ण निधीचे विघ्न आल्याने काम थांबले आहे. दुसरीकडे तहसील कार्यालयाची इमारत नसल्याने नागरिकांच्या कामावर परिणाम होत आहे.मागील तीन वर्षापासून आमगाव तहसील कार्यालयाच्या प्रशस्त इमारत बांधकामासाठी अद्यापही परिपूर्ण निधी उपलब्ध होऊ शकला नाही. शासनाने बीग बजेटला डिसेंबर २0१३ मध्ये ४ कोटी ४६ लाख ८७ हजार बांधकाम तरतुदीला मंजुरी प्रदान केली. बजेट मंजूर करून राज्य शासनाने निविदेच्या माध्यमातून कंत्राट वाटप केले. यानंतर या इमारतीच्या बांधकामाला संबंधित कंत्राटदाराने सुरुवातही केली. परंतु इमारत बांधकाम सुरू असताना तीन वर्ष कालावधीत राज्य शासनाने बजेटमधील निधीकरिता हात मागे केले. परिणामी इमारत बांधकामाला संथ गती आली. कंत्राटदाराने इमारत बांधकाम बजेटमध्ये तरतूद नसतानाही बांधकामाचा मार्ग मोकळा करून बांधकाम सुरूच ठेवले. परंतु शासनाकडून निधी आवंटीत करण्यात यश मिळाले नाही. राज्य शासनाने मंजूर बजेटपैकी १ कोटी २५ लाख ६0 हजार एवढाच निधी कंत्राटदाराला मंजूर केला. यात शासनाकडे प्रशस्त इमारत बांधकामातील ३.५0 कोटी अधिक खर्च निधी असलेली मागणी करण्यात आली आहे. परंतु या मागणीला सार्थक पाऊल पडत नसल्याने तहसीलची प्रशस्त इमारत बांधकाम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अद्यापही तहसील कार्यालयाला स्वत:च्या प्रशस्त इमारतीकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे. तर नागरिकांनाही दैनंदिन कामासाठी उघड्यावरच्या भाड्याच्या खोलीत वास्तव्य असलेल्या तहसील कार्यालयाचा आश्रय घ्यावा लागत आहे.