गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादीचे सूत जमले

0
8

गडचिरोली दि.०१ मार्च : भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे. या दृष्टीकोणातून हालचालींना वेग आला असून मंगळवारी भाजपचे २०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ व रासप समर्थीत एक सदस्य मिळून २६ सदस्यांचा गट निर्मितीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्हा परिषदेवर भाजप, राष्ट्रवादी युतीचा झेंडा फडकणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष पूर्ण प्रयत्न करेल, असे जाहीर केले होते. मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपच्या पुढाकारातून २६ सदस्यांच्या गट निर्मितीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यामुळे आता भाजपचा जि.प. सत्तेचा राजमार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेत ५१ जागांपैकी भाजपला २०, राष्ट्रवादी काँग्रेसला ५, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १५, आदिवासी विद्यार्थी संघाला ७ व अपक्ष दोेन व राष्ट्रीय समाज पक्षाला दोन जागा मिळाल्या आहे. कुणालाही बहुमत न मिळाल्यामुळे भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करावी लागली. दरम्यान सोमवारी गडचिरोली येथे वाकडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपला समर्थन देण्यावर एकमत झाल्यानंतर सोमवारी रात्री पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची गडचिरोलीत बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही पदाधिकारी उपस्थित होते, अशी सूत्रांची माहिती आहे.आता २१ मार्च रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.माहितीनुसार भाजपच्या गटनेतेपदी सावंगी-विसोरा क्षेत्रातून निवडून आलेले नानाभाऊ नाकाडे यांची एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती आहे.