हायमास्ट दिव्यांनी चकाकणार कुरखेडा शहर

0
9

कुरखेडा,दि.03: शहरात हायमास्ट दिवे लावण्यात आले असून, या दिव्यांचे लोकार्पण आ.क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासन नगर पंचायतींच्या विकासासंदर्भात सकारात्मक असल्याचे आ.गजबे यांनी यावेळी सांगितले.
गांधी चौकात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, नगर पंचायतीच्या उपाध्यक्षा जयश्री धाबेकर, पाणीपुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे, बांधकाम सभापती सोनू भट्टड, नगरसेवक बबलू हुसैनी, अॅड.उमेश वालदे, पुंडलिक देशमुख, मनोज सिडाम, नगरसेविका शाहिदा मुगल, नंदिनी दखणे, दीपाली देशमुख, महावितरणचे सहायक अभियंता श्री.उजवणे, कंत्राटदार कुंभारे उपस्थित होते.
ग्रामीण क्षेत्राप्रमाणेच नगर पंचायत क्षेत्रातही रोजगार हमी योजना व शेतीविषयक योजनांची अंमलबजावणी करण्यास शासन सकारात्मक भूमिका घेत असून, त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आ.क्रिष्णा गजबे यांनी सांगितले. शिवाय नवनिर्मित नगर पंचायतीच्या इमारतींच्या बांधकामाचा आराखडा तयार करण्याचे काम शासनस्तरावर सुरु असल्याची माहितीही आ.गजबे यांनी यावेळी दिली. नगराध्यक्ष डॉ.महेंद्रकुमार मोहबंसी यांनी आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती देऊन प्रस्तावित विकासकामांसाठी भरीव निधी देण्याची मागणी आ.गजबे यांच्याकडे केली. कार्यक्रमाचे संचालन चांगदेव फाये यांनी केले. मुख्याधिकारी मयूर भुजबळ यांनी आभार मानले.