23.8 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ २१ मार्चला होणार जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड

२१ मार्चला होणार जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड

0
31

गडचिरोली, ता.४: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक आटोपल्यानंतर आता अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली असून, त्यासाठी २१ मार्चचा मुहूर्त काढण्यात आला आहे.त्यात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापतींच्या निवडीसाठी १४ मार्चला सभा बोलावण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या उपसचिवांनी २७ फेब्रुवारी २०१७ च्या पत्रान्वये गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापतीची निवडणूक घेण्याकरिता सर्व संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना पीठासन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यासाठी मंगळवार १४ मार्च २०१७ रोजी दुपारी २ वाजता संबंधित पंचायत समित्यांच्या सभागृहात विशेष सभा ठेवण्यात आली आहे. मात्र सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेचे कामकाज सकाळी ११ वाजतापासून सुरु होणार असल्याने पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांनी सकाळी ११ वाजता नियोजित स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्याकरिता मंगळवारी २१ मार्च २०१७ रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद गडचिरोली येथील राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचेही कामकाज सकाळी ११ वाजतापासून सुरु होणार असल्याने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी सकाळी ११ वाजता उपस्थित राहुन सभेच्या कामकाजात भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.