65 रुपयांमध्ये 9 वॉटचा एलईडी बल्ब

0
10

नागपूर दि. 4 – – केंद्रीय विद्युत मंत्रालय, महाराष्ट्र शासन, एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने डोमेस्टिक लायटिंग प्रोग्रामअंतर्गत सुरू असलेल्या “उजाला’ योजनेअंतर्गत आता वीजग्राहकांना केवळ 65 रुपयांमध्ये 9 वॉटचा एलईडी बल्ब मिळणार आहेत. शहरात सात ठिकाणी बल्ब वितरण केंद्र सुरू आहेत.
शहरातील माटे चौकातील वीजबिल भरणा केंद्र, प्रतापनगर वीजबिल भरणा केंद्र, पडोळे चौक वीजबिल भरणा केंद्र, हिंगणा नाका वीजबिल भरणा केंद्र, गड्डीगोदाम येथील महावितरण कार्यालय, कॉंग्रेसनगर वीजबिल भरणा केंद्र आणि काटोल रोडवरील वीजबिल भरणा केंद्र या सात ठिकाणी नवीन एलईडी बल्ब विक्रीकरिता उपलब्ध आहेत. बल्ब खरेदीसाठी चालू वीजबिलाची छायांकित प्रत आणि ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे.
डोमेस्टीक लाईटिंग प्रोग्रामअंतर्गत प्रारंभी 100 रुपयांत 7 वॉटचा एलईडी बल्ब दिला गेला. नंतर केवळ 85 रुपयांत हा बल्ब मिळू लागला. सुरुवातीला प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त चार बल्ब दिले जात होते. त्यानंतर ही संख्या दहापर्यंत वाढविण्यात आली. या योजनेत आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात तब्बल 13 लाख 70 हजार 195 एलईडी बल्बची विक्री करण्यात आली.एलईडी बल्ब वापराने केवळ वीजबिलच नव्हे तर विजेचा वापरही कमी होणार असून, कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात मोठी घट होत प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे. 9 वॉटचा एलईडी बल्ब 80 वॉटच्या सामान्य बल्बएवढा प्रकाश देतो. म्हणजेच एलईडी बल्बने 80 टक्‍क्‍यांपर्यंत विजेची बचत होते. या योजनेत 300 रुपयांचा एलईडी बल्ब ग्राहकांना केवळ 65 रुपयांत वितरित करण्यात येत आहे. बल्बवर तीन वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे.