चंद्रपूर जिल्ह्यात११ पंचायत समित्यांवर भाजप ४ काँग्रेसच्या ताब्यात

0
9

चंद्रपूर ,दि.१५: काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील १५ पैकी ९ पंचायत समित्यांवर भाजपाने निर्विवाद बहुमत मिळविले होते. त्यामुळे सर्वाधिक पंचायत समित्यांवर भाजपाची सत्ता स्थापन होणार हे निश्चीत होते. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. यात बहुमतात असलेल्या ९ पंचायत समित्यांव्यतिरीक्त सावली व जिवती या दोन्ही पंचायत समित्यांमध्ये सारखे सदस्य असताना भाजपाने मुसंडी मारत आपली सत्ता स्थापन केली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मंळवारी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारत ११ पंचायत समित्यांवर झेंडा फडकविला. हे यश जनतेने भाजपावर दाखविलेल्या विश्वासाचे द्योतक असून चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलवू, अशी ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पोंभुर्णा, बल्लारपूर, गोंडपिंपरी या तीन पंचायत समित्यांमध्ये सर्व जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यामुळे येथे भाजपाची सत्ता स्थापन होणार हे निश्चीत होते. तर वरोरा येथे ७, मूल येथे ५, भद्रावती येथे ४, सिंदेवाही ६, ब्रह्मपुरी ९ व चंद्रपूर येथे १० जागा जिंकत भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. तर काँग्रेसने चिमूर पंचायत समितीच्या ६, नागभीड येथे ५, राजुरा येथे ५ व कोरपना येथे ४ जागा जिंकत सत्ता स्थापन केली आहे.जिवती येथे काँग्रेस व भाजपाने दोन-दोन तर सावली पंचायत समितीत प्रत्येकी तीन जागा दोन्ही पक्षांनी जिंकल्या होत्या. त्यामुळे या दोन पंचायत समित्यांवर कोणत्या पक्षाची सत्ता बसणार याकडे लक्ष लागून होते.
परंतु, येथे सभापती पदी भाजपाचे सुनील मडावी व उपसभापती पदी महेश देवकते यांची वर्णी लागली. सावली येथे भाजप व काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी चार सदस्य असताना आज सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक झाली. यात भाजपाच्या छाया शेंडे यांची सभापतीपदी तर तुकाराम ठिकरे यांची उपसभापती पदी ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. यावेळी सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

सावली पंचायत समितीत ईश्वरचिठ्ठीने सभापती, उपसभापतीची निवड
सावली : पंचायत समिती सावलीच्या मंगळवारी झालेल्या सभापती, उपसभापती पदावर ईश्वर चिठ्ठीने भाजपाचे उमेदवार निवडून आले. आठ सदस्य असलेल्या सावली पंचायत समितीमध्ये भाजपाचे चार आणि काँग्रेसचे चार असे पक्षीय बलाबल होते. काँग्रेसकडून सभापती पदासाठी मनिषा जवादे, भाजपाकडून छाया शेंडे तर उपसभापती पदासाठी भाजपाचे तुकाराम ठिकरे आणि काँग्रेसकडून विजय कोरेवार यांनी नामांकन दाखल केले. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना प्रत्येकी चार मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला. एका लहान मुलीच्या हाताने सोडत काढण्यात आली. त्यात भाजपाच्या बाजूनेच कौल मिळाला. त्यात सभापती म्हणून भाजपाच्या छाया शेंडे तर उपसभापती म्हणून तुकाराम ठिकरे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोयर यांनी काम पाहिले.