८६ लाखांच्या सायकलींच्या दरासाठी समिती बाजारात

0
5

नागपूर दि.२५: सायकल घोटाळ्यावरून दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा परिषदेत ‘यादवी’उसळल्यानंतर याचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. त्यानंतर सीईओंच्या आदेशानुसार ८६ लाखांच्या सायकलींचा नागपूरच्या बाजारातील प्रतिसायकल दर किती, हे चाचपडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या चार सदस्यीय समितीने मोठय़ा दुकानांना गुरुवार, २३ मार्च रोजी भेटी दिल्या.
क्रॉस हिरो, इको टेक या कंपनीची सायकल असून नगरच्या कंत्राटदारांनी ही सायकल पाच हजार चारशे रुपयांना समाजकल्याण विभागाला दिली होती. अशा १४२0 सायकलींची खरेदी करण्यात आली. परंतु, यात काही सदस्यांकडून घोळ झाल्याचा आरोप केल्याने जिल्हा परिषद प्रशासन खडबळून जागे झाले व समिती गठित केली.कंपनीने आपल्या नियोजित दरापेक्षाही एक हजार रुपये कमी दराने ही सायकल समाजकल्याण विभागाला स्वस्त दिली आहे. तरीही सायकल खरेदी ही पारदर्शक व्हावी, यासाठी समितीने नागपूर बाजाराचा दर तपासण्याचा निर्धार केला होता. त्यांनी जवळपास दहा दुकानांना भेटी देत त्याचे कोटेशन घेतले आहे. या समितीमध्ये पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ निंबाळकर, समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, वित्त अधिकारी व एका आयटीआय विभागाच्या अधिकार्‍याचा समावेश आहे. सायकलींच्या घोटाळ्यानंतर सीईओ डॉ. बलकवडे यांनी याविषयीची समिती स्थापन करून सात दिवसांत सर्वंकष अहवाल तयार करावा व तो वेळेत सोपविण्याचे आदेश दिले होते.