कुणबी समाजाने एकत्र येण्याची गरज- नगराध्यक्ष इंगळे

0
18

गोंदिया,दि.२५:कुणबी समाज आजही विखूरलेला आहे. या समाजाला विकासाच्या वाटेवर आणण्याची खरी गरज आहे. त्याकरिता आम्हाला मिळून प्रयत्न करावे लागेल. शहराला मी माझे घर समजून पुढील पाच वर्षे सेवा करणार आहे,असे मत गोंदियाचे नगराध्यक्ष अशोकराव इंगळे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय कुणबी समाज संघटनेच्या जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने ओल्ड गोंदिया मामा चौक येथे रविवारी) संत तुकाराम महाराज बीज महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून अशोक इंगळे बोलत होते. विशेष अतिथी व प्रबोधनाकरिता दिनेश तांबे, दीपक आरज, सुनील कडू, दीपक पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक गणेश हेमने, नगरसेवक बंटी पंचबुद्धे, अमर वर्‍हाडे, नगरसेवक कुंदा पंचबुद्धे, सभापती भावना कदम, सविता बेदरकर, रिता बागडे, माजी नगरसेविका सुनिता हेमने, मुकेश राखडे आदींची उपस्थिती होती. या वेळी प्रबोधनकार सुनील कडू यांनी जगदगुरू तुकाराम महाराज आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. पुढे ते म्हणाले, कुणबी समाजाला प्रत्येक क्षेत्रातील सत्तेत सहभागी होण्याची गरज आहे. फक्त समाजकारण करून चालणार नाही, तर राजकारणात येवून आपल्या समाजबांधवांकरिता न्याय मागण्यांचा लढा देण्याची आवश्यकता आहे.
अमर वराडे म्हणाले, कुणबी समाज महाराष्ट्रातील मूळ निवासींमधून एक आहे. परंतु, हा समाज फक्त राजकारणात दर्‍या उचलण्याचेच काम करत आहे. आता यापुढे ही प्रथा बंद करून राजकारण बाजूला सारत आपण ज्या समाजात लहानाचे मोठे झालो,त्या समाजाला प्रगतीच्या वाटेवर आणण्याची गरज आहे. प्रा. सविता बेदरकर म्हणाल्या, कुणबी समाजाच्या कोणत्याही कामाकरिता मी माझे काम म्हणून रात्री अपरात्री करते. ही भूमिका सर्व समाजबांधवांनी घेणे आवश्यक आहे. यावेळी समाजाच्या वतीने नगराध्यक्ष, समाजातील नवनियुक्त नगरसेवक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन चंद्रभान तरोणे यांनी केले. संचालन बंशीधर शहारे यांनी, तर आभार सुनिता हेमने यांनी मानले. आयोजनाकरिता प्रा. गजानन तरोणे, प्रा. उरकुडे, प्रा. मधू मेंढे, धनवंतराव शिवणकर, घनशाम शेंडे, महादेव मेंढे, देवदास शेंडे, हेतराम हेमने, तेजराम शेंडे, संतोष पाथोडे आदींनी सहकार्य केले.