कुणबीटोला येथील दारू दुकान कायम बंद करा

0
14

सालेकसा,दि.19 : तालुक्यातील कुणबीटोला (गोवारीटोला) येथील दारु दुकान १ एप्रिलपासून बंद असून ती पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली दिसून येत आहेत. सदर दारु दुकान पुन्हा सुरु न करता ती या ठिकाणातून कायमची बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समिती व बचत गटाच्या महिलांनी केली आहे.

कुणबीटोला आणि गोवारीटोला येथील जवळपास दहा महिला बचत गट, ग्रामपंचायत कावराबांध, तंटामुक्त समिती कावराबांध यांनी संयुक्तरित्या निवेदन तयार करुन जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनानुसार, सदर दारू दुकान दोन मुख्य मार्गाच्या मधात असून राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गाला लागून आहे. त्यामुळे सुप्रिम कोर्टाच्या आदेशान्वये १ एप्रिलला बंद करण्यात आले. परंतु राज्य महामार्गाकडील दारूबंद करून जिल्हा मार्गाकडील दार सुरु ठेवून पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. परंतु तसे असले तरी महामार्ग करून चौकावरून अंतर मोजले तरी नियमबाह्य बसत आहे. अर्थात राज्य महामार्गापासून २२० मीटरच्या आत अंतरात येत आहे.

तसेच सदर दारु दुकान गावात असल्याने गोवारीटोला या गावातील महिलांना या दारू दुकानामुळे अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. या जिल्हा मार्गावरून गोवारीटोला, ब्राम्हणटोला, खोलगड इत्यादी गावातील महिला नित्य कामकाजानिमित्त सतत ये-जा करीत असतात. रस्त्यावर दारु दुकान असल्याने सर्व मद्यपींची गर्दी भर रस्त्यावर असते. त्यामुळे ये-ज़ा करणाऱ्या महिलांची मोठी कोंडी होत असून अनेक प्रकारचे त्रास सहन करीत आपला मार्गक्रमण करावे लागते. अशात सदर दारु दुकान कायमस्वरुपी या ठिकाणावरुन हटविल्याशिवाय समस्या दूर होणार नाही, असे वाटत आहे.

सरपंच, उपसरपंच तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष यांनी निवेदनात म्हटले की, दारु दुकान सुरु असताना ग्रामपंचायतच्या परवानगीने दरवर्षी नूतनीकरणाचे काम केले जाते. परंतु दारु दुकान मालकाने मागील काही वर्षात कधीही परवानगी व दस्तावेज मागितले नाही. तरी सुध्दा सातत्याने दारु दुकान कशी सुरु आहे, यात काही गैरप्रकार असावे, अशी शंकासुध्दा ग्रामपंचायत पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. दारु दुकानात सतत होणारा त्रास लक्षात घेता गोवारीटोला आणि कुणबीटोला या दोन्ही गावातील महिला बचत गटाच्या महिला एकवटल्या असून या ठिकाणातून दारु दुकान कायमस्वरूपी हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा सरपंच मंजू बनोठे, उपसरपंच दिनेश सुलाखे, पं.स. सदस्य प्रमिला दसरिया, तंटामुक्त समिती अध्यक्ष चैनसिंह मच्छिरके, पोलीस पाटील पोषण बनोठे, अवंतीबाई, साक्षी, सरस्वती, उजाला, भारती, पायल बचत गट यांनी दिला आहे.