सर्वांगीण विकासात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा- बडोले

0
11

गोंदिया दि.01: जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पध्दतीत बदल करावा. शेवटच्या माणसाला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असून अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबध्द आहोत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.१ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पोलीस कवायत मैदान कारंजा येथे आयोजित करण्यात आला. पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देवून परेडचे निरिक्षण केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, उपवनसंरक्षक श्री.युवराज, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले यांची यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यात जैवविविधता विपुल प्रमाणात आहे. नैसर्गीकदृष्टया असलेल्या या जिल्ह्यात स्थानिकांना पर्यटनासोबत छोट्या-मोठ्या उद्योगातून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्नशील आहोत. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा जवळपास ६ हजार मागासवर्गीय विद्याथीनींना लाभ देण्यात आल्यामुळे ही शिष्यवृत्ती त्यांचेसाठी उपयुक्त ठरली.स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच कामानिमित्त होणारे त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजना जिल्ह्यात उपयुक्त ठरल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, जवळपास १ लाख २० हजार कुटुंबांना यातून रोजगारही मिळाला आहे. सोबतच ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहे. स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वावलंबी करण्यात येत आहे. नुकतेच सडक/अर्जुनी येथे आयोजित कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन मेळाव्यातून त्यांना स्वावलंबनाची दिशा देण्यात आली आहे.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम अमृत आहार योजनेचा लाभ ४५४ अंगणवाड्यातील २१ हजार ९९४ लाभाथ्र्यांना देण्यात येत असल्यामुळे महिलांच्या आरोग्यात सुधारणा व बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. इंधनासाठी वनावरील अवलंबीत्व कमी करण्यासाठी मागील पाच वर्षात जवळपास १४ हजार २५० कटुंबांना गॅस सिलेंडरचा पुरवठा झाल्याचे त्यांनी सांगितले.
कटंगीकला व कलपाथरी हे प्रकल्प जून २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. बेवारटोला व ओवारा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मामा तलावाचे खोलीकरण करणे, नविन दोन हजार विहिरींचे शेतकèयांना वाटप करणे व धापेवाडा उपसा सिंचन योजना लवकर पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवती व गरजुंनी घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सोनाली चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, राजेश बागडे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, लेखा अधिकारी श्री.बावीसकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.