आमसभेत प्रधानमंत्री आवास योजना ठरली चर्चेचा विषय

0
13
  • तिरोडा,दि.11 : स्थानिक पंचायत समिती तिरोडाच्या सभागृहात पार पडलेल्या आमसभेत प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध मुद्यावर चांगलीच चर्चा झाली.आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले  होते.सभेच्या सुरुवातीला मागील वर्षातील केलेल्या कार्यवाहीचा आढवा आमदार महोदयांनी घेतला. चालू वर्षामध्ये शिक्षण विभागामध्ये सद्यस्थितीत केंद्रीय बोर्डाच्या शाळेमध्ये अवाढव्य घेण्यात येणाऱ्या शुल्कावर आळा घालण्याचे निर्देश दिले. तसेच तालुक्यात सद्यस्थितीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणेनी सज्ज राहण्याचे आदेश दिले.

    त्यानंतर इंदोरा (खुर्द) येथे झालेल्या परिचर भरतीसंबंधी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून खंडविकास अधिकारी यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले. तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये खूप मोठी तफावत आढळून आली. या आवास योजनेमध्ये नवीन नाम समाविष्ट करण्याकरिता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ज्यांच्याकडे निवासाकरिता पक्के घर नसेल अशा लोकांना प्रथम प्राधान्य देवून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यास सूचित केले. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नजर ठेवूनही जर काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यास त्याची तक्रार वरिष्ठांकडे करावी, अशाप्रकारे एकंदर सर्वच विभागाकडून अहवाल सादर करण्यात आला असून आमसभा शांततेत पार पडली.सभेला भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, वीणा बिसेन, पं.स. सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, पं.स. सदस्य डॉ.बी.एस. रहांगडाले, पवन पटले, रमणीक सयाम, मनोहर राऊत, नत्थू अंबुले, माया भगत, संध्या गजभिये, जया धावडे, निता रहांगडाले, खंडविकास अधिकारी एच.एस. मानकर, दुबे, ना.त. कुंभरे, गटविकास अधिकारी मांढरे, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, विवेक ढोरे तसेच सरपंच व सचिव उपस्थित होते.