आदिवासी जनतेचा कोनसरी प्रकल्पाला विरोध

0
9

भामरागड,दि.१३: एकीकडे कोनसरी येथे होणार असलेल्या स्पाँज आयरन प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री करीत असताना त्याचवेळी एटापल्ली व भामरागड तालुक्यातील शेकडो आदिवासी नागरिकांनी सभा घेऊन या प्रकल्पाला  विरोध असल्याचे ठासून सांगितले.काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोनसरी येथे लॉयड मेटल्स आणि एनर्जी लिमिटेडद्वारे प्रस्तावित स्पाँज आयरन प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. मात्र, सुरजागड इलाका व भामरागड पट्टीतील जनतेने या प्रकल्पाला विरोध करुन खाण रद्द करण्याची मागणी केली. सुरजागड येथे सुरजागड इलाक्यातील नागरिकांनी, तर भामरागड तालुक्यात धोडराज येथे त्या भागातील नागरिकांनी सभा घेऊन प्रखर विरोध दर्शविला.

स्थानिक जनतेचा सर्वच प्रकारच्या खनिज खाणी व खाणपूरक कामांना प्रखर विरोध आहे. आम्हाला खाण नको असून, आम्ही खाण कदापीही सुरु होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी स्थानिक जनतेने दिला. ज्या संघटना लोहप्रकल्प अहेरी उपविभाग किंवा एटापल्ली तालुक्यात झाला पाहिजे अशी मागणी करीत आहेत, त्यांचाही सभेत निषेध करण्यात आला. आम्हाला कोणत्याही परिस्थतीत खाण मंजूर नाही. त्यामुळे प्रकल्प कुठे उभारायचा, या मुद्याचा प्रश्नच येत नाही, असेही नागरिकांनी स्पष्ट केले.